माणगाव | मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर बायपास कामांच्या भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिकेतून मंत्री भरत गोगावले यांचे नाव वगळले गेले. यामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात पुन्हा वाद पेटला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील रखडलेल्या बायपास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम शुक्रवारी (३ ऑक्टोबर) आयोजित करण्यात आला होता.
हे भूमिपूजन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत भाजप खासदार धैर्यशील पाटील यांचे नाव होते. मंत्री अदिती तटकरे तटकरे यांचेही नाव होते; मात्र शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे नाव पुन्हा एकदा वगळल्याची चर्चा रंगली आहे. याआधीही रोहा येथील डॉ.चिंतामणराव देशमुख सभागृहाच्या कार्यक्रमात गोगावले यांना राष्ट्रवादी काँग्रेसने डावलल्याची घटना घडली होती, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
आता पुन्हा माणगाव आणि इंदापूर बायपास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाजप नेत्यांना सोबत घेऊन शिवसेनेला डावलण्याची खेळी राष्ट्रवादीने केली असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या घटनांमुळे रायगडमध्ये ‘राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना’ वाद अधिक चिघळला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरमहाआघाडी कुठल्या मोडवर जाते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.