नवी मुंबई | फळांच्या राजाची अर्थात हापूस आंब्याची वाशी येथील मुंबई एपीएमसी बाजारात झोकात एन्ट्री झाली आहे. कोकणातून आलेल्या या हापूस आंब्याच्या सहा डझनच्या पेटीला तब्बल २५ हजार रुपये विक्रमी दर मिळाला. आतापर्यंत हापूसला मिळालेल्या दरांपैकी हा सर्वाधिक दर ठरला आहे.
कोकणातील हापूस आंबा साधारणपणे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बाजारात दाखल होतो, मात्र यंदा ऑक्टोबरमध्येच तो मुंबईत पोहोचला आहे. देवगड तालुक्यातील पडवणे गावातील बागायतदार प्रकाश धोंडू शिर्सेकर यांनी ही हापूस आंब्याची पेटी वाशी एपीएमसी फळ बाजारात पाठवली होती. आंबा व्यापारी नानाभाऊ जेजूरकर अँड कंपनीने या पहिल्या पेटीची पुजा केली.
‘मुहूर्ताच्या या हापूस पेटीला २५ हजारांचा विक्रमी दर मिळाल्याचे जेजूरकर यांनी सांगितले. मुंबईतील एका ग्राहकाने ही पेटी खरेदी केली असून, त्याचे नाव व्यापार्यांनी गोपनीय ठेवले आहे. आतापर्यंत हापूसला २० ते २२ हजारांपर्यंत दर मिळत असताना, यंदाच्या दिवाळीच्या पेटीने नवा उच्चांक गाठला आहे. शिर्सेकर यांच्या बागेत जुलै महिन्यातच काही कलमांना आगाऊ मोहोर आला होता. त्यांनी विशेष प्लास्टिक आच्छादन आणि फवारणीद्वारे फळधारणा टिकवून ठेवली.
त्यातून तयार झालेल्या आंब्यांपैकी ही पहिली पेटी दिवाळीपूर्वीच मुंबईत दाखल झाली. दरम्यान, यंदा पावसाच्या उशिरामुळे हापूसचा मुख्य हंगाम जानेवारीच्या शेवटच्या किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता व्यापार्यांनी व्यक्त केली आहे. मात्र तरीही कोकणातून इतक्या लवकर आलेल्या ‘हापूस’ने बाजारात खर्या अर्थाने "हापूसची दिवाळी” आणली आहे.