पनवेल | तळोजा येथे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत १९ वर्षीय तरुणीने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील ‘रिफ्युज एरिया’मधून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत तरुणी पनवेल येथील एका हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती.
ती तिच्या पालकांसह तळोज्यातील एका उंच इमारतीच्या ११व्या मजल्यावर राहत होती. घटनेच्या दिवशी ती घरी एकटीच होती. तिचे वडील कामावर गेले होते, तर आई सातार्याला आपल्या आईला भेटण्यासाठी गेली होती. दुपारच्या सुमारास इमारतीमधील एका रहिवाशाने तरुणीने उडी मारल्याचे पाहिले आणि तातडीने तळोजा पोलिसांना माहिती दिली.
स्थानिक रहिवाशांच्या मदतीने तिला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासानुसार अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.