जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत

03 Oct 2025 20:33:00
 mumbai
 
मुंबई | राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी १३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. संबंधित जिल्हाधिकारी १० ऑक्टोबर २०२५ रोजी वृत्तपत्रांत आरक्षण सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील.
 
१३ ऑक्टोबर रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना जाहीर केली जाईल. त्यावर १४ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. हरकती व सूचनांचा विचार करून ३ नोव्हेंबर रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण जाहीर केले जाईल.
 
दरम्यान, राज्यातील २४७ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर १३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0