महेंद्र दळवी तटकरेंचे पाय धरुन मोठे झाले, मग; खा. तटकरे लोकसभेला आ.दळवींच्या घरी फेर्‍या का मारत होते?

03 Oct 2025 20:09:50
alibag
 
अलिबाग | अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे सुनील तटकरेंचे पाय धरून मोठे झाले की, लोकसभेला तटकरे...? असा तिखट सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख राजा कोणी यांनी विचारला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर केलेल्या टिकेनंतर शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी जोरदार पलटवार केला आहे.
 
अलिबागला येण्याची भाषा करणार्‍यांच्या स्वागतासाठी महाप्रसादाची व्यवस्था करुन ठेवली आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी महाड येथे पत्रकार परिषद घेवून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर तोंडसुख घेतले होते. तटकरे यांच्या पायाला हात लावून मोठे झालेले दळवी...दळवींनी अलिबागची नगरपालिका सांभाळावी... रस्त्यांसाठी जनतेला आंदोलन करण्याची वेळ का येते? असे काही सवाल त्यांनी उपस्थित केले होते.
 
तसेच दळवी यांच्या कौटुंबिक विषयालाही छेडण्याचा प्रयत्न करतानाच, अलिबागला येवून बोलावे लागेल, असा इशारा देशमुख यांनी दिला होता. यावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी जोरदार पलटवार केला आहे. हिंमत असेल तर देशमुख यांनी अलिबागला येवून दाखवावे, असे म्हटले आहे. देशमुख आता काँगे्रसमधून राष्ट्रवादीत गेलेत. त्याआधी ते तटकरे कुटुंबाबाबत काय म्हणायचे ? याची एकदा आठवण करावी, असा सल्ला केली यांनी दिला आहे. जिल्ह्यात डोंबार्‍याचा खेळ सुनील तटकरे करत आले आहेत. सुनील तटकरे यांचे पाय धरुन आ. दळवी पुढे गेल्याचा जो शोध देशमुख यांनी लावला आहे तो हास्यास्पद आहे.
 
तटकरेंचे पाय धरून आमदार दळवी नाही तर लोकसभा निवडणुकीत तटकरेंना निवडून आणण्याचे काम शिवसेनेने, आ. दळवी यांनी केले आहे. त्यावेळी खा. तटकरे आ. दळवी यांच्या घरी फेर्‍या मारत होते. त्यांना मताधिक्य मिळवण्यासाठी विनंत्या करत होते. त्यामुळे देशमुख तुम्ही टीका करत आहात ती थांबवा; अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा शेवटी केणी यांनी दिला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0