पनवेल । उसने घेतलेले पैसे परत न दिल्यामुळे पनवेल येथील महिलेची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी याबाबत माहिती दिली. 25 ऑक्टोबर रोजी सकाळी पनवेल येथील कुंडेवहाळ येथे एका महिलेचा गळा आवळून खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
घटनास्थळी पोलीस अधिकारी व अमलदारांनी भेट दिली असता मृतदेहाची ओळख संगीता नामदेव म्हात्रे (वय 55) अशी पटली. तिच्या अंगावरील काही सोन्याचे दागिने चोरी झाल्याचेही निदर्शनास आले. या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा सनी नामदेव म्हात्रे याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याच्या तपासात साक्षीदार नसल्याने तपास अत्यंत गुंतागुंतीचा ठरला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा मुंढे, सारिका झांझुर्णे, प्रियांका शिंदे आणि महिला अमलदारांनी स्थानिक नागरिकांची चौकशी केली. पोलीस शिपाई विशाल दुधे यांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामुळे गुन्ह्याचे धागेदोरे मिळाले. चौकशीत मोहम्मद समीर अल्लाउद्दीन अन्सारी (वय 23, व्यवसाय डेअरी) या युवकाचे नाव पुढे आले. त्याने मृत महिलेस 40 हजार रुपये उसणे दिले होते. ही रक्कम परत मागितल्यावर वारंवार वाद होत होता.
24 ऑक्टोबरच्या रात्री तो महिलेकडे पैसे मागण्यासाठी गेला असता, पैसे देण्यास नकार मिळाल्याने संतापाच्या भरात त्याने तिचा गळा आवळून खून केल्याचे त्याने कबूल केले. या गुन्ह्याचा कोणताही ठोस पुरावा नसताना पनवेल शहर पोलिसांनी संयम, बारकाई आणि दक्षतेने तपास करून आरोपीला जेरबंद केले. या कारवाईत सहायक सहा. पोलीस निरीक्षक प्रविण फडतरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे, हजरत पठाण, प्रियांका शिंदे, पोलीस हवालदार ज्योती दुधाणे, देवांगी म्हात्रे, तसेच पोलीस शिपाई अर्चना देसाई, साधना पवार, ज्योती कहांडळ, सुप्रिया ढोमे, सुशीला सवार, तेजश्री काशिद, स्वाती पाचुपते यांचा सहभाग होता.