रायगड किनारपट्टीला वादळी पावसाचा तडाखा , उरण येथील सहा मच्छिमार बोटी बेपत्ता?

29 Oct 2025 20:40:09
uran
 
उरण । जिल्ह्यातील उरण किनारपट्टीला वादळी पावसाचा तडाखा बसला आहे. खोल समुद्रात गेलेल्या सहा मच्छिमार बोटी भरकटल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या बोटी मासेमारी करून करंजा आणि आसपासच्या बंदरांच्या दिशेने परतत असताना वार्‍याच्या जोरदार तडाख्यामुळे त्यांचा संपर्क तुटला असल्याची चर्चा आहे.
 
रविवारी मुंबईपासून सुमारे 700 किलोमीटर अंतरावर दोन बोटी वादळात सापडून बुडाल्याची घटना घडली होती. त्या घटनेतील खलाशांना सुखरूप वाचविण्यात आले होते. मात्र, पुन्हा एकदा वादळी वारे वाहू लागल्याने समुद्रात गेलेल्या काही बोटींचा संपर्क बिनतारी संदेशाद्वारेही होऊ शकला नाही, अशी माहिती इतर मच्छिमारांनी दिली आहे.
 
ही बाब समोर आल्यानंतर करंजा मच्छिमार संस्थेच्या अध्यक्षांनी, भरकटलेल्या बोटींचा संपर्क पुन्हा झाला असून त्या सुरक्षितपणे किनार्‍याकडे येत असल्याची माहिती दिली आहे. तसेच, रायगड जिल्ह्यातील कोणतीही बोट हरवल्याची नोंद नसल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त संजय पाटील यांनी म्हटले आहे. तटरक्षक दलाला भरकटलेल्या जहाजांना मदत व सहकार्य करण्याची विनंती करणारे संदेश पाठविण्यात आले आहेत.
 
त्यात संबंधित मच्छिमार बोटींची माहितीही देण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभर समुद्र खवळलेला असून, त्यामुळे अनेक बंदरांतील हजारो मासेमारी बोटी मासेमारी न करताच परतल्या आहेत. खराब हवामानात मासेमारी करणे धोकादायक ठरत असल्याने मच्छिमारांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0