चालकाला डुलकी...कार दुभाजकावर आदळली , ६ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

26 Oct 2025 12:52:07
khalapur
 
वावोशी | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) पहाटे खालापूर टोल नाका परिसरात भीषण अपघात घडला. या अपघातात सहा जण जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
 
माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्‍या कारच्या चालकाला अचानक डुलकी लागल्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले; परिणामी कार थेट दुभाजकावर आदळली. या धडकेत टोल नाका परिसरात कार्यरत असलेला एक टोल कर्मचारीही जखमी झाला. अपघातात कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला असून, वाहनातील वयोवृद्ध आजी-आजोबा गंभीर जखमी झाले आहेत.
 
वाहनचालक, त्याची पत्नी, मुलगा आणि मुलगी यांना किरकोळ जखमा आल्या आहेत. सर्व जखमींना तातडीने एम.जी.एम. रुग्णालय, कामोठे येथे दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर देवदूत आपत्कालीन पथक, आयआरबी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलीस, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान, लोकमान्य अ‍ॅम्बुलन्स सर्विस आणि हेल्प फाऊंडेशनच्या मदतीने तत्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. विशेषत: टोल कर्मचार्‍यांच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्तांना वेळेत मदत मिळाली. या घटनेची नोंद खालापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0