अलिबाग | दिवाळीचा सण संपला, फटाक्यांची आतिषबाजी शांत झाली आणि आता राज्यात राजकारणाची आतिषबाजी सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. लवकरच राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजणार असून, ग्रामपंचायतींपासून ते जिल्हा परिषदांपर्यंतच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
रायगडातदेखील महायुती आणि महाआघाडी आहे. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत त्या राहतील की तुटतील? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.राज्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाआघाडी हे दोन प्रमुख राजकीय गट सक्रिय आहेत. मात्र, या निवडणुकांत ही आघाड्या टिकणार की बिघडणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यात महायुतीमधील अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते सुनील तटकरे आणि शिवसेना (शिंदे गट)मधील तिन्ही आमदारांमध्ये सध्या वाद पेटलेले आहेत. त्यामुळे महायुतीचे स्थानिक पातळीवरील समीकरण विस्कटले आहे. आगामी निवडणुका हे दोन्ही पक्ष निवडणुकीच्या रणांगणात एकत्र येतात की स्वतंत्र लढतीचा मार्ग स्वीकारतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचे अगदी पध्दतशीरपणे मार्गक्रमण सुरु आहे.
महायुतीत लढा, नका लढू सत्तेच्या चाव्या आपल्याकडे राहणार, असा विश्वास भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला आहे. त्यामुळे दोघांच्या भांडणात विनाकारण नाक खुपसण्याची हुशारी भाजपने दाखवलेली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील विरोधी पक्षांची स्थिती कोमात केल्यासारखी आहे. शेकाप काही ना काही विषय घेऊन रस्त्यावर दिसते. काँग्रेसचे रस्त्यावरचे अस्तित्वच जणूकाही संपून गेले की काय? असा प्रश्न पडायला जागा आहे. महाआघाडीतील अन्य घटक पक्षांचीही ती अवस्था आहे.
त्यामुळे रायगडमध्ये आगामी स्थानिक निवडणुका "महायुती विरुद्ध महाआघाडी” अशा स्वरूपात नव्हे, तर "महायुती विरुद्ध महायुती” अशा स्वरूपात रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील इतर भागांप्रमाणे रायगडमध्येही नगरपरिषद, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी गड मजबूत करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
दिवाळीनिमित्त अनेक नेत्यांनी हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. आगामी काही आठवड्यांत आरोप-प्रत्यारोपांचे राजकीय फटाके फुटायला सुरुवात होणार आहे.