कर्जत | "महाराष्ट्र हे असे राज्य आहे की येथे गाईला गोमातेचे स्थान दिले गेले आहे. पुढील काळात मतदान करताना गोमातेला वाचवण्याची प्रतिज्ञा करणार्यालाच मत द्या,” असे त्यांनी स्पष्ट प्रतिपादन जगद्गुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी केले.
तालुक्यातील सावरगाव येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले, "मी राजकारण करत नाही, धर्मकारण करतो. कारण राष्ट्रपती आणि पंतप्रधानसुद्धा चरणस्पर्श करण्यासाठी येतात. आपल्या गोमातेला रक्षण देणारा उमेदवारच खरा सेवक आहे. जशी आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी स्वतःचा त्याग करते, तशी गोमाता मानवजातीसाठी सदैव पुढे असते.
महाराज म्हणाले, "गोमातेला वाचवण्यासाठी जो प्रयत्न करीत नाही, तोसुद्धा गोहत्येत दोषी ठरतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी बालवयातच गोमातेचे रक्षण केले होते. जर गोहत्या थांबल्या नाहीत, तर त्याची मोठी किंमत पुढे मोजावी लागेल. काही ठिकाणी आज हिंदूंना दहन करण्यासही मनाई होते, गोसेवकांना प्रवेश नाकारला जातो ही आपल्या देशातील शोकांतिका आहे.
सावरगाव येथे अशोक सावंत व सुभाष सावंत यांच्या परिवाराने उभारलेल्या श्री शिवमंदिरात शिवपिंड रौप्यकवच समर्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. शंकराचार्य महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजनानंतर रौप्यकवच समर्पण करण्यात आले. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, संतोष भोईर, अनिल कडू, संजय कडू, नरेश ठाकर, चेतन सावंत, योगेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.