मुंबई | सर्वत्र दिवाळीचा सण सुरु आहे.दिव्यांचा उत्सव साजरा होत आहे. घरा घरात फराळाचा सुगंध दरवळत आहे, आकाश कंदील खुणावत आहेत. अंगणात रंगीबेरंगी रांगाळी जीवनाचा सार समजावून सांगत आहे. लहान मुलं फटाके वाजवण्याचा आनंद मिळवत आहेत.
महत्वाचे म्हणजे, वर्षभर मेहनत करुन पिकवलेलं सोन्यासारखं पीक, घरात आणताची शेतकर्याची लगबग सुरु आहे. सर्व आनंदी वातावरण असताना, पावसाने पुन्हा एकदा बेरंगी एन्ट्री घेतली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस वादळी वार्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
ऐन दिवाळीत मंगळवारी (ता. २१) दुपारी दोन वाजल्यापासून पालीसह रायगडात विविध ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत राहिला. परतीच्या या पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. परिणामी ऐन दिवाळीत व्यापारी आणि शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसामुळे येथे वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेले ग्राहक पावसामुळे माघारी परतले.
शेतकर्यांचे भाताचे पिक अजूनही शेतात आहेत, तर काहींनी कापून ठेवले आहेत. परंतु पावसामुळे या पिकांचे नुकसान झाले आहे. व्यापारी आणि दुकानदारांनी दिवाळीसाठी लाखो रुपयांचा माल भरून ठेवला होता. मात्र, पावसामुळे ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडले नाहीत, त्यामुळे ऐन दिवाळीत वस्तूंना अपेक्षित उठाव मिळणार नाही. फटाके विक्रेत्यांचा माल भिजला तर इलेक्ट्रिक सामान, आकाशकंदील, दिवे आदी देखील पावसामुळे खराब झाले आहेत.
पालीतील व्यापारी मुकुंद कोसुंबकर यांनी या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. शेतकर्यांचे धान्य अजून शेतात असल्याने आणि सुगीच्या दिवसांना सुरुवात झालेली नसल्याने पावसामुळे भाताचे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतामध्ये भाताचे पीक चांगले आले होते. भाताची कापणी करून झोडणीची कामे सुरू करणार होतो. मात्र ऐनवेळी परतीच्या मुसळधार पावसाचे आगमन झाले. उभे भात पिक अक्षरशः आडवे झाले आहे. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी राम तुपे यांनी केली आहे.