पनवेल | आंबे श्रद्धा या इमारतीमध्ये मंगळवारी (२१ ऑक्टोबर) पहाटे आग लागली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच ही दुर्घटना घडली. या आगीत रेखा शिसोदिया आणि मुलगी पायल शिसोदिया या माय-लेकीचा होरपळून मुत्यू झाला. त्याचबरोबर बाजूच्या आणि वरच्या फ्लॅटचे नुकसान झाले.
इतर जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. मृत महिला अंदाजे ४५ वर्षांची असून तिची मुलगी १९ वर्षांची होती. हे दोघी झोपेत असतानाच शेजारील किचनमध्ये स्फोट झाला. हे घर ड्युप्लेक्स स्वरुपाचे असून प्रवेशद्वाराजवळच स्वयंपाकघर आहे. स्फोटामुळे आणि दाट धुरामुळे बेडरूममध्ये झोपलेल्या आई-मुलीला बाहेर पडता आले नाही.
त्यामुळे त्या दोघींचा आतमध्येच होरफळून मृत्यू झाला.घरात एकूण तीन गॅस सिलिंडर होते. त्यापैकी दोन सिलिंडरचा स्फोट झाला. सुदैवाने कुटुंबातील इतर दोन सदस्य त्यावेळी नाईट शिफ्टसाठी बाहेर कामावर गेले होते, त्यामुळे ते बचावले.स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी गॅस लिकेजमुळे ही दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग विझवली. घटनेची माहिती समजताच आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिवाळी पहाट कार्यक्रमातून कामोठे कडे धाव घेतली.