अलिबाग । रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचे अंतिम आरक्षण जाहीर झाले आहे. जिल्ह्यातील एकूण 59 निवडणूक विभागांसाठी हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तब्बल 30 जागांवर महिला उमेदवार असणार आहेत.
यात त्यामध्ये अनुसूचित जाती दोन पैकी एक महिला, अनुसूचित जमाती 9 पैकी 5 महिला, ना. मागास प्रवर्ग 15 पैकी 8 महिला, सर्वसाधारण 33 पैकी 16 महिला जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.अलिबाग जिल्हा नियोजनच्या कार्यालयात सोमवारी (13 ऑक्टोबर) दोन लहान मुलींच्या हातून ही सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
अलिबाग तालुक्यात शहापूर, आवास, चौल या विभागांमध्ये सर्वसाधारण आरक्षण आहे, तर आंबेपूर आणि थळ येथे सर्वसाधारण (स्त्री), आणि चेंढरे येथे नामाप्र (स्त्री) तर काविरसाठी नामाप्र जागा निश्चित झाली आहे. आपल्या मनासारखे आरक्षण पडावे यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. प्रत्यक्षात आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांची दांडी उडाली आहे. काहींना मतदारसंघ बदलावे लागणार आहेत.
एकंदरीत आगामी निवडणुकीत इच्छुकांना आतापासूनच तयारी करावी लागणार आहे.थळमध्ये मानसी दळवी, चौलमध्ये सुरेंद्र म्हात्रे, कोर्लईमधून राजेश्री मिसाळ, आवासमधून दिलीप भोईर या पूर्वीच्या सदस्यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा आहे. त्यांच्या मनाप्रमाणे आरक्षण पडल्यामुळे त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांना मात्र स्वतःया इच्छेला मुरड घालावी लागणार आहे.
ते लढण्यासाठी इच्छुक असलेल्या आंबेपूर मतदारसंघात महिला आरक्षण पडले आहे. त्यामुळे रसिका केणी या त्यांच्या पत्नीसाठी जिल्हा परिषदेत जाण्याचा मार्ग निर्माण झाला आहे. याच मतदारसंघातून माजी सभापती, विद्यमान भाजपच्या जिल्हा महिला अध्यक्ष चित्रा पाटील यांचीदेखील दावेदारी असेल. सर्वांचेच लक्ष लागून राहिलेल्या चेंढरे मतदारसंघावर पूर्वीचे शेकाप नेते आता भाजपवासी झालेले संजय पाटील यांचे लक्ष होते.
मात्र या ठिकणी ओबीसी महिला आरक्षण पडल्यामुळे त्यांना इच्छेला मुरड घालावी लागणार आहे. त्यांच्या पत्नी प्रियदर्शनी पाटील या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे आमदार महेंद्र दळवी यांच्या सुनबाई अदिती दळवी यांच्या नावाची चर्चा या मतदारसंघातून सुरु आहे. त्यामुळे शेकाप, भाजप आणि अन्य पक्ष कोण उमेदवार देणार? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
असे आहे आरक्षण
सर्वसाधारण (खुले) । पाभरे, पांगळोली, नडगाव तर्फे बिरवाडी, करंजाडी, लोहारे, निजामपूर, मोर्बा, वासांबे, सावरोली, दादर, वडखळ, शहापूर, आवास, चौल, राजपुरी, नागोठणे, भुवनेश्वर.
सर्वसाधारण (महिला) । आराठी, चरई खुर्द, तळाशेत, पळस्पे, वडघर, गव्हाण, माणगांव तर्फे वरेडी, नेरळ, आतकरवाडी, जांभूळपाडा, शिहू, नवघर, चाणजे, आंबेपुर, थळ, कोर्लई.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (खुले) । दासगाव, कापडे बुद्रुक, केळवणे, कडाव, जासई, चिरनेर, काविर.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) । बिरवाडी, खरवली, रहाटाड, वावंजे, वावेघर, चेंढरे, आंबेवाडी, घोसाळे.
अनुसूचित जमाती (खुले) । नेरे, कळंब, राबगाव, महलमिर्या डोंगर.
अनुसूचित जमाती (महिला) । बोर्लीपंचतन, कशेळे, मोठे वेणगांव, चौक, जिते.
अनुसूचित जाती (खुले) । गोरेगांव.
अनुसूचित जाती (महिला) । पालीदेवद