शिक्षकांसाठी माजी आ.सुरेश लाड यांचा जिल्हा परिषदेत ठिय्या

14 Oct 2025 17:14:55
 karjat
 
कर्जत । तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या बदल्यांचे लेखी आदेश काढूनही त्यांना हजर केले जात नसल्यामुळे कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला आहे.
 
25 सप्टेंबर रोजी शिक्षकांच्या मुलाखतीनंतर बदल्या करण्यात आल्या असूनही संबंधित शिक्षकांना अद्याप त्यांच्या नवीन शाळांवर रुजू होऊ दिलेले नाही. कर्जत तालुका आदिवासी बहुल असल्याने दुर्गम भागात शिक्षकांची तीव्र गरज भासत असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
सोमवारी (दि.13) सुरेश लाड हे सीईओ नेहा भोसले यांची भेट घेण्यासाठी जिल्हा परिषदेत पोहोचले असता, त्या शिक्षक पुरस्कार सोहळ्यासाठी गेल्या समजल्यानंतर त्यांनी कार्यक्रमस्थळीच भेट घेतली. मात्र यावेळी अपेक्षीत उत्तर न मिळाल्याने लाड थेट सीईओंच्या दालनात जाऊन प्रतिक्षा कक्षात बैठक मांडून बसले. “शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्रत्यक्षात लागू करूनच येथूेन जाणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या संपूर्ण घटनेमुळे अधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराबाबत संतापाची लाट उसळली आहे.
मंत्री अदिती तटकरे, सुरेश लाड यांच्यात शाब्दीक चकमक
बदल्या झालेल्या शिक्षकांना कर्जतमध्ये का पाठवत नाही ? असा सवाल सुरेश लाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांना कार्यक्रम स्थळी विचारला. यावर तेथे उपस्थिती असलेल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हस्तक्षेप करत माझ्या मतदारसंघात 50 पदे रिक्त आहेत, मी काय करणार? असे उत्तर दिले.
 
यावर तुम्ही सरकारमध्ये आहात, जनतेच्या प्रश्नांचे समाधान करणे आपले काम आहे, असे लाड यांनी सुनावले. तटकरे यांच्या वागणुकीमुळे नाराज लाड यांनी जिल्हा परिषद कार्यालय गाठले आणि ठिय्या मांडला. कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेल्या या वादामुळे उपस्थितदेखील अवाक् झाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची माजी आमदारांना दुय्यम वागणूक
ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या त्यांना त्या त्या शांळामध्ये रुजू करा, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करणार्‍या माजी आमदार सुरेश लाड यांना मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दुय्यम दर्जाची वागणूक दिल्याचा आरोप लाड यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
 
एक माजी आमदारावर आंदोलन करण्याची वेळ आल्यानंतर, नेहा भोसले यांनी त्यांच्याशी बोलण्याचे सौजन्य तर सोडाच अक्षरशः दुर्लक्ष केले. दोन तासानंतर श्रीवर्धनचे बिडीओ लाड यांना भेटण्यासाठी आले; मात्र त्यांच्याकडे ठोस उत्तर नसल्यामुळे लाड यांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले.
 
Powered By Sangraha 9.0