मोहपाडा | खालापूर तालुक्यातील मोहापाडा परिसरात ‘भीशी’ व उच्च व्याजदराच्या स्कीमच्या नावाखाली एका महिलेने १०० हून अधिक खातेदारांची सुमारे १.६८ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये बहुसंख्य खातेदार महिला आहेत. तक्रारीनुसार, संशयित महिला महिन्याला ५ टक्के व्याज दराचे आमिष दाखवून पैसे उकळत होती.
काही खातेदारांना रोखीने पैसे दिले, तर काहींना पोस्टडेटेड चेक देण्यात आले, जे बाऊन्स झाले कारण खात्यात पुरेशी रक्कम नव्हती. फसवणूक झालेल्या खातेदारांनी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. तक्रारदारांनी सांगितले की, महिला १०० लोकांकडून १.५ कोटी रुपये घेऊन परदेश दौर्यांवर जात आहे आणि महागडी इमारत उभारून तिथे राहते, मात्र पैसे परत करण्यासाठी घर विकण्यास तयार नाही.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, ही रक्कम केवळ सुरुवात असून फसवणूक ३ कोटींपर्यंत पोहोचू शकते. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास सुरू असून, तक्रारी वाढल्यास संशयित महिलेकडून अटक केली जाईल. तपासात तिच्या मालमत्तेची चौकशी, आर्थिक व्यवहार आणि इतर गुंतवणुकींचा मागोवा घेण्यात येणार आहे.