महाडमध्ये ५ लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात!

12 Oct 2025 17:33:01
 alibag3
 
अलिबाग | रायगड पोलीस विभागाची प्रतिमा मलिन करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई न करण्याच्या मोबदल्यात तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागणार्‍या पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. आरोपी हवालदाराने पहिल्या हप्त्यापोटी ३ लाख रुपये स्वीकारताना महाड शहरात सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
 
रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेला हवालदार विशाल वाघाटे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० ऑक्टोबर रोजी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास महाड शहरात लाच घेताना रंगेहात पकडले. तक्रारदार हा ३० वर्षीय पुरुष असून, त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई टाळण्यासाठी आरोपी वाघाटे याने ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने ८ ऑक्टोबर रोजी लाच मागणीची.तक्रार अँटी करप्शन ब्युरोकडे दाखल केली.
 
 
त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी लाच मागणीची पडताळणी करून आरोपीची मागणी खरी असल्याचे स्पष्ट झाले. निर्धारित ठिकाणी म्हणजेच महाड शहरात १० ऑक्टोबर रोजी पहिल्या हप्त्यापोटी ३ लाख रुपये स्वीकारत असतानाच वाघाटेला पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही सापळा कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
 
पथकामध्ये पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, पोलीस निरीक्षक नारायण सरोदे, फौजदार विनोद जाधव, अरुण करकरे, सुषमा राऊळ यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. संपूर्ण मोहिमेला अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे आणि सुहास शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
 
 
Powered By Sangraha 9.0