रायगड जिल्ह्यातील बँकांमध्ये 158 कोटींच्या ठेवी पडून ! बँकांकडून ठेवींसाठी विशेष जनजागृती

10 Oct 2025 18:03:58
 Alibag
 
अलिबाग । रायगड जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये तब्बल 158 कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी पडून आहेत. या ठेवींचा परतावा 4 कोटी 75 लाख 127 खातेदारांना मिळवून देण्यासाठी 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
 
ही मोहीम जिल्हा अग्रणी बँक बँक ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने आणि सर्व सदस्य बँकांच्या सहकार्याने राबवली जात असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजयकुमार कुलकर्णी यांनी दिली. कुलकर्णी यांनी सांगितले की, देशभरात सुमारे 1 लाख 35 हजार कोटी रुपये दावा न केलेल्या ठेवींच्या स्वरूपात विविध बँकांमध्ये पडून आहेत.
 
त्यापैकी महाराष्ट्र राज्यात 5 हजार 866 कोटी रुपये शिल्लक असून, त्यात वैयक्तिक खात्यांचे 4 हजार 612 कोटी, संस्थांचे 1 हजार 82 कोटी, आणि सरकारी योजनांतील 172 कोटी रुपये समाविष्ट आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, 10 वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या खात्यांतील ठेवी हस्तांतरित केल्या जातात. मात्र, खातेदारांना या ठेवींचा पूर्ण कायदेशीर परतावा मिळविण्याचा अधिकार आहे.
 
खातेदारांनी आपले पैसे परत मिळविण्यासाठी संबंधित बँकेत संपर्क साधावा आणि आवश्यक कागदपत्रे तसेच अद्ययावत सादर करावीत. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सर्व बँकांकडून जनजागृती शिबिरे, ग्राहक भेटी तसेच पंचायत समिती स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. ही शिबिरे 13 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, बँक खातेदारांनी आपल्या दावा न केलेल्या ठेवी परत मिळविण्याची ही संधी गमावू नये, असे आवाहन बँक व्यवस्थापकांनी केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0