राजिपचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर ; जिल्ह्यातील १५ शिक्षकांसह एका विशेष शिक्षकाचा होणार गौरव

By Raigad Times    06-Sep-2026
Total Views |
ALIBAG
 
अलिबाग | रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात येणारे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६-२७ जाहीर करण्यात आले असून जिल्ह्यातील १५ शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
 
यासोबतच कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल एका शिक्षकाला विशेष शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा गौरव १० सप्टेंबर रोजी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाट्यगृहात आयोजित सोहळ्यात करण्यात येणार आहे.
 
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेकडून दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. यंदाही प्राथमिक शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
तालुकानिहाय पुरस्कारप्राप्त शिक्षक
अलिबाग तालुक्यातील सुगंधा पाटील (राजिप शाळा वाडगाव), पेण तालुक्यातील रामकृष्ण भोईर (राजिप शाळा मायणी कोयना), पनवेल तालुक्यातील विभावरी सिंगासने (तळोजे पाचनंद), कर्जत तालुक्यातील राजेश मेचकर (राजिप शाळा मार्गाची), खालापूर तालुक्यातील रुपाली पाटील (राजिप शाळा मोहोपाडा), उरण तालुक्यातील शर्मिला गावंड (राजिप शाळा नवीन शेवे), सुधागड तालुक्यातील स्मिता जगताप (राजिप शाळा रासळ आदिवासीवाडी), रोहा तालुक्यातील अमिता बामणे (राजिप शाळा रोठ खुर्द), महाड तालुक्यातील संजय कोंडविलकर (राजिप शाळा कांबळे तर्फे महाड), श्रीवर्धन तालुक्यातील मनोज माळवदे (राजिप शाळा बापवन), म्हसळा तालुक्यातील महादेव पवार (राजिप शाळा तुरुंबाडी), पोलादपूर तालुक्यातील संगिता नगरकर (राजिप शाळा चांभारगणी खुर्द), माणगाव तालुक्यातील सरफराज कोंडविलकर (राजिप उर्दू शाळा टेमपाले), तळा तालुक्यातील धर्मा राणे (राजिप शाळा मालाठेवाडी) आणि मुरूड तालुक्यातील महेंद्र सातामकर (राजिप शाळा साळाव) यांची जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
 
याशिवाय पनवेल तालुक्यातील राजिप शाळा केळवणेचे उपशिक्षक कुमार पाटील यांना कला क्षेत्रातील विशेष शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कारप्राप्त सर्व शिक्षकांचा गौरव करण्यासाठी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाट्यगृहात गुरुवार, १० सप्टेंबर रोजी भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षकांच्या कार्याचा गौरव करणार्‍या या सोहळ्याला जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
 
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, वित्त व शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी, समाजकल्याण सभापती नारायण डामसे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.