कळंबोलीत पाणीटंचाईचे संकट ; गणेशोत्सवाच्या तोंडावर नागरिकांचा सिडको कार्यालयावर मोर्चा

By Raigad Times    06-Sep-2026
Total Views |
new mumbai
 
कळंबोली | गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच कळंबोली शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहराची दैनंदिन पाण्याची गरज सुमारे ३० दशलक्ष लिटर असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून गेल्या काही दिवसांपासून केवळ १७ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होत आहे.
 
त्यामुळे तब्बल १३ दशलक्ष लिटर पाण्याची तूट निर्माण झाली असून, नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे मोठे आव्हान सिडको प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. दरम्यान, एलआयजी-१, सेटर-३ येथील नागरिकांनी पाणीपुरवठ्यातील अनियमितता तसेच मीटरच्या समस्येविरोधात शुक्रवारी कळंबोली येथील सिडको कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात एलआयजी-१ परिसरातील मोठ्या संख्येने रहिवासी सहभागी झाले होते.
 
नगरसेविका सरस्वती काथारा आणि मोनिका महानवर यांचीही उपस्थिती होती. नागरिकांनी परिसरातील अनियमित पाणीपुरवठ्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत ‘पाणी द्या’ अशी मागणी प्रशासनाकडे केली. मोर्चादरम्यान नागरिकांनी पाणीपुरवठा आणि मीटरसंदर्भातील समस्या सिडको प्रशासनासमोर ठामपणे मांडल्या. मात्र, अधिकार्‍यांकडून नागरिकांच्या प्रश्नांना समाधानकारक आणि ठोस उत्तरे मिळाली नसल्याची नाराजी रहिवाशांनी व्यक्त केली.
 
नागरिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर सिडको प्रशासनाने येत्या दोन दिवसांत एलआयजी-१ परिसरात दिवसातून दोन वेळा नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे ओशासन दिले. तसेच नवीन पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले असून, पुढील आठवड्यापासून पाणीटंचाईची समस्या दूर होईल, अशी शोशती प्रशासनाकडून देण्यात आली. मीटरच्या प्रश्नावरही १० सप्टेंबर रोजी एलआयजी-१ मधील सर्व रहिवाशांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
 
या बैठकीत मीटरच्या समस्येवर सविस्तर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे ओशासन सिडको प्रशासनाने दिले. कळंबोली परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असून, वाढती लोकसंख्या आणि घरगुती वापरामुळे पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. गणेशोत्सवासाठी नागरिकांची तयारी सुरू झाली असून, घरांची स्वच्छता, गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना, धार्मिक कार्यक्रम आणि पाहुण्यांची वाढणारी वर्दळ यामुळे पाण्याची मागणी आणखी वाढण्याची शयता आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.