शाळेच्या बसमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; कामोठ्यात संतापजनक प्रकार

बसचालकाचे अमानुष कृत्य; कामोठे पोलिसांच्या आरोपीला बेड्या

By Raigad Times    06-Sep-2026
Total Views |
new mumbai
 
कळंबोली | कामोठे येथे शाळेतून घरी परतणार्‍या तीन वर्षांच्या चिमुकलीवर खासगी स्कूल बसच्या चालकाने बसमध्येच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी बसचालक इस्का आरगुम यादव (रा. सेक्टर-३, कळंबोली) याला अटक केली आहे. या घटनेमुळे पनवेल-कामोठे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
 
पीडित बालिका कामोठे सेक्टर-३६ येथील एका नामांकित शाळेत बालवाडीत शिकते. ती दररोज खाजगी स्कूल बसने शाळेत ये-जा करत होती. बुधवारी, २ सप्टेंबर रोजी दुपारी शाळा सुटल्यानंतर ती नेहमीप्रमाणे बसने घरी निघाली. मार्गातील इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या थांब्यावर उतरवल्यानंतर चिमुकली बसमध्ये एकटी राहिली. याचा गैरफायदा घेत चालकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
 
घरी पोहोचल्यानंतर चिमुकलीने पोटात दुखत असल्याचे सांगत रडण्यास सुरुवात केली. कुटुंबीयांनी तिची प्रेमाने विचारपूस केली असता तिने बसचालकाने त्रास दिल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने शाळा प्रशासनाला माहिती देत रात्री कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कामोठे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, तपासणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदी तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला गुरुवारी अटक करून पनवेल न्यायालयात हजर केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला ५ सप्टेंबर २०२६पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर खासगी स्कूल बसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बससोबत महिला अटेंडंट किंवा केअरटेकर का नव्हती? चालकाची नियुक्ती करण्यापूर्वी त्याची योग्य पडताळणी करण्यात आली होती का? यासह अन्य बाबींचा पोलीस तपास करीत आहेत.