अलिबाग | रायगड जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोणताही वाद किंवा विसंवाद नसून, आगामी तीन वर्षे केवळ विकासाला प्राधान्य देऊन काम करण्याची आहेत, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी मांडली.
अलिबाग येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्या असून आता निवडणुकीचे राजकारण बाजूला ठेवून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे तटकरे यांनी सांगितले. भरत गोगावले यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर आपण स्वतः त्यांचे स्वागत केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार, तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार कार्यरत आहे. त्यामुळे रायगडमधील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
बारणेंशी कौटुंबिक संबंध;श्रेयवादाची चर्चा फेटाळली
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी असलेल्या संबंधांवरुन सुरु असलेल्या चर्चांनाही तटकरे यांनी पूर्णविराम दिला. "माझे आणि आप्पा बारणे यांचे अत्यंत सलोख्याचे आणि कौटुंबिक संबंध आहेत. आम्ही पूर्वी एकाच पक्षात एकत्र काम केले असून, संसदेतही ते माझे जवळचे मित्र आहेत.
आज सकाळीच माझे त्यांच्याशी बोलणे झाले,” असे त्यांनी सांगितले. मावळ लोकसभा मतदारसंघ आपला नसला तरी संपूर्ण रायगड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातील प्रश्नांकडे लक्ष देणे आपले कर्तव्य असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बारणे यांच्याशी कोणताही दुरावा किंवा वाद नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
महिला सवलतीवरुन विरोधकांना प्रत्युत्तर
राज्य शासनाकडून महिलांना एसटी प्रवासात देण्यात येणार्या ५० टक्के सवलतीसह विविध कल्याणकारी योजनांबाबत विरोधकांकडून करण्यात येणार्या आक्षेपांनाही तटकरे यांनी उत्तर दिले. शासनाच्या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) पद्धतीचा वापर केला जात असून, त्यासाठी केवायसी पडताळणी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.