अलिबाग | मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सीच्या भाडेदरात वाढ केल्यानंतर नवीन दर भाडेमीटरमध्ये लागू करण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
त्यामुळे अलिबाग आणि पेण या दोन तालुक्यांतील सर्व ऑटोरिक्षा व टॅक्सीधारकांनी आपल्या वाहनांच्या भाडेमीटरचे नव्या दरानुसार समायोजन करून घेणे बंधनकारक आहे. मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास १ डिसेंबरपासून विलंबाच्या प्रत्येक दिवसाला ५० रुपये विभागीय दंडात्मक शुल्क आकारले जाणार आहे.
हे शुल्क कमाल ५ हजार रुपयांपर्यंत असेल. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या २० ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या बैठकीत ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सीच्या भाडेदरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत जुन्या मीटरमध्ये नवीन भाडेदरानुसार आवश्यक बदल करून घेण्याची संधी देण्यात आली आहे.
या निर्णयाचा पेण प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अलिबाग व पेण तालुक्यांतील वाहनांनाही समावेश आहे. भाडेमीटरचे समायोजन करणार्या संस्थांनी आपल्या निर्धारित कार्यक्षेत्राबाहेरील ऑटोरिक्षा किंवा मीटर टॅक्सीला प्रमाणपत्र देऊ नये, असे निर्देश आहेत.
तसेच संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयांनीही आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील संस्थांकडून जारी करण्यात आलेले प्रमाणपत्र स्वीकारू नये, असा निर्णय घेण्यात आला आहे. मीटर सील करताना ऑटोरिक्षाच्या मीटरसाठी एक रेटो सील, आवश्यकता असल्यास दोन रेटो सील, तर टॅक्सी मीटरसाठी दोन रेटो सील वापरणे आवश्यक आहे. मीटरमध्ये बसविण्यात आलेल्या सीलचे क्रमांक संगणकीय बीजकावर नमूद करणे बंधनकारक करण्यात आले असून हस्तलिखित बीजकाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
प्रवाशांकडून नवीन दरानुसारच भाडे आकारावे
नवीन भाडेदर लागू झाल्यानंतर रिक्षा व टॅक्सीचालकांनी प्रवाशांकडून नवीन दरानुसार योग्य भाडेच आकारावे, तसेच मीटर समायोजनाची प्रक्रिया निर्धारित नियमांनुसार पूर्ण करावी, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. अलिबाग आणि पेण तालुक्यातील वाहनधारकांनी ३० नोव्हेंबरची अंतिम मुदत लक्षात घेऊन वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.