उत्सवाचा आनंद हवा, उन्माद नको

By Raigad Times    06-Sep-2026
Total Views |
lekh
 
उमाजी म. केळुसकर | ज्येष्ठ पत्रकार |महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत गोकुळाष्टमी आणि त्यानंतर साजरा होणारा गोपाळकाला या उत्सवांना अत्यंत आपुलकीचे आणि उत्साहाचे स्थान आहे. श्रीकृष्णाच्या बाललीलांचे स्मरण करत एकत्र येणे, दहीहंडी फोडणे आणि बंधुभावाचा संदेश देणे हा या उत्सवाचा मूळ आत्मा आहे.
 
परंतु, गेल्या काही दशकांत या पवित्र परंपरेला जडलेले व्यावसायिकतेचे आणि उत्सवी उन्मादाचे ग्रहण अत्यंत चिंताजनक ठरत आहे. मूळ परंपरेतील साधेपणा, भक्तिभाव आणि आनंद बाजूला राहून त्याची जागा आता अथांग पैशांचा खेळ, धोकादायक स्पर्धा आणि अश्लील मनोरंजनाने घेतली आहे. हा बदल केवळ उत्सवाचे स्वरूप बदलणारा नाही, तर समाजाच्या नैतिक अधोगतीचे आणि मानवी जिवाच्या अवमूल्यनाचे लक्षण ठरत आहे.
 
गोपाळकाला म्हटला की डोळ्यांसमोर येतो तो दहीहंडीचा थरार. मात्र, श्रीकृष्णाने स्वतः कधीही आठ-नऊ थरांचे मानवी मनोरे उभारून दहीहंडी फोडल्याचा उल्लेख कोणत्याही ग्रंथात किंवा इतिहासात आढळत नाही. बालकृष्णाने आपल्या सवंगड्यांच्या खांद्यावर पाय देऊन लोणी चोरल्याच्या कथा नक्कीच आहेत, पण त्यात अपार स्नेहाचा, एकात्मतेचा आणि बालसहज आनंदाचा भाग होता.
 
आजच्या सारखी धोकादायक, जीवघेणी स्पर्धा आणि एकमेकांना मागे टाकण्याची ईर्ष्या तिथे मुळीच नव्हती. मुंबई आणि ठाणे परिसरात साधारण चार दशकांपूर्वी हंडीचे थर उंच करण्याची एक नवी व्यावसायिक स्पर्धा हळूहळू सुरू झाली. सुरुवातीला हा प्रकार केवळ एक साहसी खेळ आणि गर्दी आकर्षित करण्याचा भाग वाटला, तरी हळूहळू या स्पर्धेने अक्राळविक्राळ आणि भीषण स्वरूप धारण केले.
 
मुंबईतून सुरू झालेला हा उंच थरांचा सोस बघता बघता महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आणि ग्रामीण भागातही पसरला, ज्यामुळे मूळ उत्सवी स्वरूप पार हरवून गेले. आज परिस्थिती अशी आहे की, अधिक थरांचा विक्रम करण्यासाठी, प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी आणि लाखोंची पारितोषिके लाटण्यासाठी लहानलहान गोविंदांना कोणतीही पक्की सुरक्षायंत्रणा नसताना जीवावर उदार होऊन उंचावर पाठवले जाते. या उंच थरांच्या नादात आजवर राज्यातील कित्येक निष्पाप तरुण मृत्युमुखी पडले आहेत, तर कित्येकजण आयुष्यभरासाठी अपंग झाले आहेत.
 
घराचा एकमेव कमावता, ऐन तारुण्यात असणारा मुलगा केवळ एका हंडीच्या क्षणिक आवेशापोटी आयुष्यातून उठतो किंवा बिछान्याला खिळून राहतो, तेव्हा त्या कुटुंबावर कोसळणारा दुःखाचा डोंगर वर्णन पलीकडचा असतो. या अपंगत्वाची आणि मृत्यूची खरी जबाबदारी कोणाची? ज्या गोविंदांचा बळी जातो किंवा जे जायबंदी होतात, त्यांच्या कुटुंबाला काही लाखांची तुटपुंजी मदत देऊन आयोजक किंवा राजकारणी आपली जबाबदारी झटकून मोकळे होतात. परंतु, गमावलेला जीव, उद्ध्वस्त झालेले भविष्य किंवा हरवलेले आरोग्य अशा पैशांनी कधीही परत मिळू शकत नाही.
 
उत्सवाच्या या विकृतीकरणाला खतपाणी घालण्यात राजकीय नेते आणि तथाकथित आयोजकांचा मोठा वाटा आहे. स्वतःचे राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी, ताकद दाखवण्यासाठी आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मतांचे राजकारण करण्यासाठी लाखोंची आणि करोडोंची बक्षिसे जाहीर केली जातात. या बक्षिसांच्या आमिषापोटी निष्पाप गोविंदांना आगीत लोटले जाते. एवढ्यावरच हे थांबत नाही, तर उत्सवात गर्दी आकर्षित करण्यासाठी डीजेचा कानाचा पडदा फाडणारा, आरोग्याला घातक असा कर्कश आवाज, चित्रपट अभिनेत्रींचे असभ्य हावभाव आणि बारबालांना सार्वजनिक मंचावर नाचवण्यापर्यंत या उत्सवाची घसरण झाली आहे.
 
ज्या उत्सवात श्रीकृष्ण आणि भक्तीचे नाव घेतले जाते, तिथे अशा प्रकारचा अश्लील, बाजारू आणि बीभत्स प्रकार चालणे ही आपली मोठी सांस्कृतिक अधोगती आहे. डीजेच्या तालावर चालणारा हा हुल्लडबाजीचा आणि गोंधळाचा प्रकार गोपाळकाल्याच्या पवित्रतेला आणि मूल्यांना उघडपणे काळिमा फासणारा आहे. उत्सवाचा आनंद निश्चितच घेतला पाहिजे, पण त्या आनंदाचे रुपांतर उन्मादात, दहशतीत आणि विभत्सतेत होता कामा नये.
 
परंपरा जपणे आणि साहसाचा आदर करणे यात मोठा फरक आहे. साहसाच्या नावाखाली प्राणांची बाजी लावणे आणि नियमांना पायदळी तुडवणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. दुर्दैवाने, आज गोपाळकाल्याला एका कॉर्पोरेट इव्हेंटचे आणि जाहिरातबाजीचे स्वरूप आले आहे. जिथे कॅमेरे, महागडे स्पॉन्सर्स, ग्लॅमर आणि पैशांचा पाऊस आहे, पण उत्सवाचा मूळ भक्तीभाव व ओलावा पूर्णपणे गायब आहे. उत्सव हा राजकीय इव्हेंट नको, तो सर्वसामान्यांचा उत्सवच राहिला पाहिजे. लोकांच्या भावनांशी, श्रद्धेशी आणि तरुणांच्या जिवाशी खेळून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा हा धंदा आता वेळीच थांबला पाहिजे.
 
या संपूर्ण गंभीर परिस्थितीवर आळा घालण्यासाठी आता लोकप्रतिनिधींनी, प्रशासनाने आणि शासनाने अत्यंत आवश्यक, ठोस आणि कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. केवळ न्यायालयाच्या नियमांवर बोट दाखवून, कागदी घोडे नाचवून किंवा पोकळ घोषणा करून आता चालणार नाही. मानवी मनोर्‍यांच्या उंचीवर कायदेशीर व ठाम मर्यादा आणणे, १४ वर्षांखालील लहान मुलांच्या सहभागावर प्रत्यक्ष व कडक बंदी घालणे, आणि हेल्मेट, मॅट यांसारख्या सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य केले पाहिजे.
 
आयोजकांवर कायद्याची व गुन्ह्याची थेट जबाबदारी निश्चित झाली पाहिजे; जर एखाद्या गोविंदाचा अपघात झाला किंवा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यासाठी आयोजकांना आणि बक्षीस जाहीर करणार्‍या नेत्यांनाच गुन्हेगार मानून जबाबदार धरले पाहिजे. तसेच रात्रीच्या वेळी चालणार्‍या डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर आणि उत्सवातील अशा प्रकारच्या बीभत्स, अश्लील कार्यक्रमांवर कायमचा बंदीचा बडगा उगारला गेला पाहिजे.
 
गोपाळकाला हा एकत्र येण्याचा, बंधुता वाढवण्याचा, समता जपणारा आणि आनंदाची उधळण करण्याचा ऐतिहासिक सण आहे. त्याला केवळ एका दिवसाचा थिल्लरपणा, धोकादायक जीवघेणा खेळ किंवा राजकारण्यांचा इव्हेंट बनू देणे अत्यंत घातक आहे. समाजातील सुजाण नागरिकांनी, विचारवंतांनी आणि गोविंदा पथकांच्या प्रमुखांनीही स्वतःहून पुढाकार घेऊन या विकृतीला पूर्णविराम दिला पाहिजे.
 
आपल्या मुलांचे प्राण पणाला लावून मिळालेली बक्षिसे किंवा चषक हे आनंदाची नाही तर कायमच्या दुःखाची नांदी ठरतात, याचे भान सर्व पालकांनी व आयोजकांनी ठेवले पाहिजे. जेव्हा आपण या उत्सवातील उन्माद, अश्लीलता, बाजारूपणा आणि जीवघेणी स्पर्धा पूर्णपणे काढून टाकू, तेव्हाच खर्‍या अर्थाने श्रीकृष्णजन्माचा आणि गोपाळकाल्याचा मूळ पवित्र संदेश आणि आनंद आपण सर्वांना अनुभवता येईल.