गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्‍या ; चाकरमान्यांकडून जादा भाडे आकारणार्‍यांवर कारवाईचा बडगा !

प्रवाशांची लूट, गैरवर्तन अन्? नियमभंग खपवून घेणार नाही; पनवेल आरटीओचा इशारा

By Raigad Times    06-Sep-2026
Total Views |
ALIBAG
 
अलिबाग | गणेशोत्सवासाठी मुंबईसह विविध भागांतून कोकणात येणार्‍या लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि विनाअडथळा व्हावा, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेलने कडक भूमिका घेतली आहे.
 
गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवाशांची गैरसोय, लूटमार, अवाजवी भाडे आकारणी, गैरवर्तन तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालक व मालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आरटीओने दिला आहे. गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे स्थानके, बसस्थानके आणि प्रमुख वाहतूक केंद्रांवर प्रवाशांची मोठी गर्दी होणार आहे.
 
या पार्श्वभूमीवर रिक्षा व प्रवासी बस वाहतूकदारांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रिक्षाचालकांनी वाहनाची सर्व आवश्यक कागदपत्रे वैध ठेवणे बंधनकारक आहे. रेल्वे स्थानकांसह प्रमुख थांब्यांवर रिक्षा उभ्या करताना वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शासन अथवा परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक भाडे आकारण्यास मनाई करण्यात आली आहे.
 
प्रवाशांशी उद्धटपणे वर्तन करू नये तसेच रिक्षेच्या प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. खासगी व प्रवासी बस चालक-मालकांनीही गणेशोत्सव काळात विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बसमधील आपत्कालीन खिडकी किंवा दरवाजा, अग्निशामक यंत्रणा आणि प्रथमोपचार पेटी सुस्थितीत व वापरण्यायोग्य असणे आवश्यक आहे.
 
चालकाने मद्यपान करून किंवा धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्यास संबंधित चालकासह बसमालकावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाईल. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसच्या फेर्‍या आणि सुटण्याच्या वेळांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. गर्दीचा गैरफायदा घेऊन निश्चित दरापेक्षा जादा भाडे आकारणार्‍या वाहतूकदारांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
 
रिक्षा किंवा बसमधून जादा भाडे आकारले जात असल्यास, प्रवाशांशी गैरवर्तन होत असल्यास किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन आढळल्यास नागरिकांनी संबंधित वाहनाचा क्रमांक, प्रवासाचा मार्ग आणि तक्रारीचा तपशील नमूद करून प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेलच्या अधिकृत ई-मेलवर .४६-. तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात वाहतूकदारांनी नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच कोकणात येणार्‍या चाकरमान्यांनीही सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि कोणताही गैरप्रकार आढळल्यास तत्काळ परिवहन विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.