खालापूरात महामोर्चाचा पुन्हा ‘एल्गार’; अन्यथा ११ सप्टेंबर रोजी आंदोलन; सुधाकर घारेंची भूमिका

By Raigad Times    06-Sep-2026
Total Views |
karjat
 
कर्जत | खालापूरातील कामगारांच्या प्रश्नावरुन काढण्यात येणारा महाएल्गार मोर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याने स्थगित केला. मात्र आमच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्यास ११ सप्टेंबर रोजी एक लाखांचा मोर्चा धडकणार, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी दिला.
 
सुधाकर घारे यांनी शुक्रवारी (४ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत आंदोलनाची पुढील भूमिका स्पष्ट केली. यावेळी पुंडलिक पाटील, नवीन घाटवळ, भरत भगत, बाबू घारे, सुनील पाटील, भिवसेन बडेकर, संतोष जंगम, दीपक श्रीखंडे, किशोर पाटील, नगराध्यक्ष पुष्पा दगडे, उपनगराध्यक्ष संतोष पाटील, अश्विनी पाटील, अशोक भोपतराव, एकनाथ पिंगळे, एकनाथ धुळे, अ‍ॅड. राजेंद्र निगुडकर, पंकज पाटील आदी उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना, घारे यांनी पोलीसांच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली. चर्चेसाठी बोलावून फसवून अटक करण्यात आली. हा लोकशाहीचा खून असल्याचा आरोप घारे यांनी केला. अटकेची माहिती मिळताच खासदार सुनील तटकरे एका तासात खालापूर येथे आले. त्यानंतर चर्चा होऊन सुटका झाल्याचे त्यांनी सांगितले कंपन्यांमधील स्थानिक कामगारांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी आणि त्यांना योग्य न्याय मिळावा, यासाठी सुधाकर घारे घेतील त्या भूमिकेच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार पत्रकार परिषदेत उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला. प्रसंगी गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार थोरवेंच्या भूमिकेवर सवाल
दरम्यान, आमदार महेंद्र थोरवे यांच्या भूमिकेवरही घारे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात आदिवासींचे प्रश्न सुटल्याशिवाय टोरेंट किंवा अन्य प्रकल्प होऊ देणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, आता ‘टोरेंट प्रकल्प आपण आणला’ असे सांगितले जात असल्याचा दावा करत "नेमकी भूमिका कोणती?” असा सवाल घारे यांनी केला.
 
तसेच महा एल्गार आंदोलन कंपनी पर्यंत जाऊ नये अशा सूचना मी प्रशासनाला दिला होता. असेही ते बोलले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणी मार्ग काढण्यासाठी बैठक बोलवणार आहेत. या बैठकीला मला आणि पालकमंत्री भरत गोगावले यांना आमंत्रित करा. असे मुख्यमंत्र्यांना भेटून सांगतात. म्हणजे नक्की काय अर्थ काढायचा? असा प्रश्न उपस्थित केला.