मापगाव येथील विजय थळे यांच्या हत्येप्रकरणी दोनजण अटकेत

दगडखाणीवरुन वाद | पोकलनच्या ब्रेकरचा घातला घाव

By Raigad Times    04-Sep-2026
Total Views |
alibag 
 
अलिबाग | अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील विजय थळे यांच्या हत्येप्रकरणी दोनजणांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. निकेश दळवी आणि आशिष दळवी अशी त्यांची नावे असून बहिरोळे येथील ते रहिवासी आहेत. दगडखाणीच्या वादातून थळे यांची त्यांनी हत्या केली. दोघांनाही न्यायालयाने ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
मापगावातील टाकादेवी मंदिराजवळ विजया लक्ष्मी ट्रान्सपोर्टच्या खाणीत माती व दगडाचे खोदकाम सुरू होते. बहिरोळे येथील निकेश व आशिष दळवी यांच्याकडून सुरू असलेल्या या कामाबाबत थळे यांनी सुमारे आठ दिवसांपूर्वी जाब विचारला होता. विनापरवानगी दगड-मातीचे उत्खनन करून त्याची विक्री करू नये, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दीक वाद झाला होता.
 
शिवीगाळ आणि धमकी देण्यात आल्याची माहितीही पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. बुधवारी (३ सप्टेंबर) सायंकाळी निकेश आणि आशिष हे दोघे भाऊ पोकलनच्या सहाय्याने खाणीत दगड फोडण्याचे काम करीत होते. विजय थळे तेथे गेले असता पुन्हा त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर पोकलनच्या ब्रेकरने विजय थळे यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
 
यावेळी विजय थळे यांच्यासोबत असलेल्या शांताराम नामक व्यक्तीलाही मारण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र शांताराम स्वतः चा जीव वाचविण्यात यशस्वी झाला. यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. याबाबत माहिती मिळातच अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
 
पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य धोंडे, पोलीस हवालदार परेश म्हात्रे, विलास आंबेतकर, पोलीस शिपाई सुनील जाधव, अनिकेत पाटील, संकेत पाटील, अनिकेत ढिवरे व पोलीस हवालदार तुषार घरत (सायबर शाखा) असे पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. हत्येनंतर हल्लेखोर पेझारीकडे पळून गेले; मात्र तेथे नाकाबंदी करण्यात आली होती.
 
पोलिसांचा दबाव वाढताच ते तेथून परत फिरले. अखेर बहिरोळे येथे त्यांच्या घराजवळ पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. याप्रकरणी दोन्ही भावांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत कदम करीत आहेत. खाणीतील खोदकामासाठी परवानगी होती का? वादाचे नेमके कारण काय? आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याबाबतही पोलीस तपास करीत आहेत.
 
दरम्यान, थळे यांच्या घरी त्याच दिवशी पूजा होती. दिवसभर ते घरीच होते. आणखी काही तास ते घरीच थांबले असते तर हा अनर्थ घडला नसता, अशा प्रतिक्रीया उमटत होत्या. मापगाव येथील या घटनेनंतर, चार-दोन दगड गोट्यांसाठी एका कर्त्या पुरुषाचा जीव गेला, दोघांच्या हातात बेड्या आल्या आणि आणि दोन कुटुंबे विनाकारण उघड्यावर आली आहेत.