मुंबई-गोवा महामार्गासाठी नवी डेडलाईन ! महामार्गाचे काम जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करणार-मंत्री शिवेंद्रराजे भोसले

नागोठणे उड्डाणपूल छोट्या वाहनांसाठी खुला होणार;माणगाव-इंदापूर बायपासही मार्गी लागणार

By Raigad Times    04-Sep-2026
Total Views |
mahad
 
महाड | सगळे झाले, मंत्री शिवेंद्रराजे भोसलेही येऊन गेले; पण मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (३ सप्टेंबर) त्यांनी महामार्गाची पाहणी केली. यानंतर त्यांनी महामार्ग पूर्ण करण्यासाठी जानेवारी २०२७ ही नवी डेडलाईन जाहीर केली आहे.
 
तसेच माणगाव आणि इंदापूर बायपासचे कामही तोपर्यंत पूर्ण होईल असेही त्यांनी म्हटले आहे.गौरी-गणपतीच्या काळात कोकणाकडे मोठ्या संख्येने चाकरमानी येत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. वाहतुकीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून दैनंदिन अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव काळात नागोठणे उड्डाणपूल छोट्या वाहनांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
माणगाव आणि इंदापूर बायपासची बहुतांश कामे पूर्ण झाली असली तरी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे सध्या या मार्गांचा पूर्ण क्षमतेने वापर करता येत नाही. जानेवारी २०२७ पर्यंत दोन्ही बायपास पूर्ण करण्याचे नियोजन असून, पुणे-ताम्हिणी मार्गे कोकणात येणार्‍या वाहनांना माणगाव बायपासचा मोठा फायदा होणार आहे, असे शिवेंद्रराजे यांनी सांगितले. गणेशोत्सवात कोकणाकडे जाणार्‍या चाकरमान्यांची संख्या वाढणार असल्याने नागोठणे उड्डाणपूल छोट्या वाहनांसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
 
मात्र, अवजड वाहनांना या पुलावरून वाहतूक करता येणार नाही. वाहतुकीवर सतत लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्याचे आदेश अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. महामार्गालगतची अतिक्रमणे आणि हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस विभाग आणि स्थानिक प्रशासनाला आवश्यक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतुकीचा ताण वाढल्यास पर्यायी मार्गांचा वापर करता यावा, यासाठी अंतर्गत रस्ते सुस्थितीत ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.
 
गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक ठिकाणी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वैद्यकीय सेवा आणि सुविधा केंद्रे उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या पाहणी व आढावा बैठकीस आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
खारपाडा टोलवसुलीला बे्रक लागणार?
महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली करू नये, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी केली. त्यानंतर पालकमंत्री गोगावले यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून साधत परिस्थितीची जाणीव करून दिली.
 
यावेळी नितीन गडकरी यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्याजवळ बोलताना आपण तसा प्रस्ताव द्यावा, सदर टोल काही काळासाठी बंद करण्याच्या आश्वासन दिले. त्यामुळ खारपाडा येथील टोल वसुलीला तात्पुरता ब्रेक मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.