नवी मुंबई विमानतळाची भरारी ! ३० लाख प्रवाशांचा टप्पा पार;४६ शहरांशी हवाई जोडणी

By Raigad Times    04-Sep-2026
Total Views |
 uran
 
उरण | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने व्यावसायिक विमानसेवा सुरू केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच ३० लाख प्रवाशांचा टप्पा पार केला आहे. २५ डिसेंबर २०२५ रोजी व्यावसायिक विमानसेवा सुरू झाल्यानंतर मिळालेला हा प्रतिसाद नवी मुंबई विमानतळाच्या वेगाने होत असलेल्या विस्ताराची साक्ष देणारा ठरला आहे. विमानतळावरून सध्या ४६ गंतव्यस्थानांशी हवाई जोडणी झाली असून, सुरुवातीला असलेली १३ गंतव्यस्थानांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
 
उदयपूर, जोधपूर, रांची, दरभंगा, गुवाहाटी आणि सिंधुदुर्ग या सहा नव्या देशांतर्गत शहरांचा लवकरच हवाई मार्गिकांमध्ये समावेश होणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी हवाई प्रवासाचे पर्याय आणखी वाढणार आहेत. व्यावसायिक सेवा सुरू झाल्यापासून विमानतळाने आतापर्यंत सुमारे २२ हजार ५०० व्यावसायिक विमानफेर्‍या हाताळल्या आहेत. विशेष म्हणजे विमानतळ सुरू झाल्यानंतर २०० दिवसांपेक्षा कमी कालावधीत अबुधाबीला नियोजित आंतरराष्ट्रीय विमानसेवाही सुरू झाली आहे.
 
आंतरराष्ट्रीय हवाई संपर्काचा आणखी विस्तार करण्यासाठी नोव्हेंबर २०२६ मध्ये नव्या विमान कंपन्या आणि हवाई मार्गिकांचा समावेश करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पश्चिम भारतासाठी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीचे महत्त्वाचे प्रवेशद्वार म्हणून नवी मुंबई विमानतळाचे स्थान अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी व व्यवस्थापन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड मार्फत करण्यात येत असून, अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड आणि सिडकोच्या सार्वजनिक-खासगी भागीदारीतून हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे.
 
विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर दरवर्षी तब्बल ९ कोटी प्रवाशांची हाताळणी करण्याची क्षमता निर्माण होणार आहे. प्रारंभीच्या टप्प्यात २ कोटी प्रवाशांची वार्षिक क्षमता विकसित करण्यात आली आहे. याशिवाय दरवर्षी ५ लाख मेट्रीक टन मालवाहतूक हाताळण्याची क्षमता उपलब्ध होणार आहे. नवी मुंबई विमानतळाच्या वाढत्या हवाई जोडणीमुळे मुंबई महानगर प्रदेशासह रायगड आणि आसपासच्या औद्योगिक पट्ट्याच्या विकासालाही नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.