अलिबाग | रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचे मंगेश वाकडीकर यांचे स्वीय सहाय्यक तथा वित्त विभागातील वित्त लेखा सहाय्यक योगेश प्रकाश भस्मे यांना दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.
या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्हा परिषद अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केली आहे. योगेश भस्मे यांने तक्रारदाराच्या पत्नीची बदली करून देण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. लाचेची रक्कम स्वीकारताना बुधवारी (२३ सप्टेंबर) भस्मे यांना अटक करण्यात आली आहे.
भस्मे हे जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात कार्यरत असून, त्यांच्याकडे अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही जबाबदारी होती. भस्मे यांना लाच स्वीकारताना पकडण्यात आले असले, तरी या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग होता का, लाचेची रक्कम कोणाच्या सांगण्यावरून मागण्यात आली होती का आणि बदलीच्या प्रक्रियेत भस्मे यांची नेमकी भूमिका काय होती, हे तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे, अशी भूमिका बाळाराम पाटील यांनी मांडली.
शिक्षिकेच्या बदलीचा विषय संबंधित प्रशासकीय विभागाशी निगडित असताना वित्त विभागातील कर्मचार्याकडे या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका होती, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. बदलीचा अर्ज कोणत्या स्तरावर प्रलंबित होता, त्यावर कोणत्या अधिकार्यांची स्वाक्षरी अथवा शिफारस आवश्यक होती आणि संबंधित फाईल कोणकोणत्या अधिकार्यांकडून पुढे सरकली, याचा तपास होणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, एसीबीच्या कारवाईनंतर या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे त्यामुळे याबाबत कोणताही निष्कर्ष तपास पूर्ण होण्यापूर्वी काढता येणार नाही. त्यामुळे या प्रकरणातील सर्व संबंधित दुव्यांचा निःपक्षपातीपणे तपास होण्याकडे जिल्हा परिषद वर्तुळाचे लक्ष लागले आहे.