योगेश भस्मे याला तीन दिवसांची पोलीस कोठडी

By Raigad Times    27-Sep-2026
Total Views |
alibag
 
अलिबाग | रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक योगेश प्रकाश भस्मे यांना लाच स्वीकारल्याप्रकरणी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने बुधवारी (दि. २३) भस्मे यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते.
 
त्यानंतर गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. भस्मे हे रायगड जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात वित्त लेखा सहाय्यक म्हणून कार्यरत असून, त्यांच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही जबाबदारी होती. त्यामुळे एसीबीच्या कारवाईने जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे.
 
भस्मे यांनी लाचेची रक्कम कोणाच्या सांगण्यावरून मागितली होती का, बदलीच्या प्रक्रियेत त्यांची नेमकी भूमिका काय होती, तसेच या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास एसीबीकडून केला जात आहे. तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याने या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.