नागोठणेतील घरफोड्यांचा रायगड पोलिसांकडून छडा; सराईत चोरटा जेरबंद, तीन राज्यात ६८ गुन्हे

By Raigad Times    27-Sep-2026
Total Views |
nagothane
नागोठणे | नागोठणे परिसरातत झालेल्या दिवसा घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करताना रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आंतरराज्य अट्टल चोरट्याला अटक केली. लोकेश रावसाहेब सुतार (रा. लिंगनूर, ता. मिरज, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
 
त्याच्यावर तीन राज्यात तब्बल ६८ गुन्हे दाखल आहेत. नागोठणे पोलीस ठाण्यात ९ सप्टेंबर २०२६ रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला. या पथकाने चोरट्याचा छडा लावला असून याप्रकारणी लोकेश सुतार याला अटक केली आहे. यानंतर त्याला नागोठणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
 
लोकेश सुतार याचा गंभीर गुन्हेगारी इतिहास समोर आला. कर्नाटकातील बागलकोट, बेळगाव आणि विजयपुरा, गोव्यातील ओल्ड गोवा तसेच महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, नागपूर, अकोला, धुळे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील पेण व नागोठणे आदी पोलीस ठाण्यांत त्याच्याविरुद्ध एकूण ६८ गुन्हे नोंद असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यामध्ये घरफोडी, चोरी, आर्म्स अ‍ॅक्ट आणि खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
 
याच प्रकरणातील दुसरा आरोपी सुखदेव हनुमंत नाईक (वय २६, रा. आरग, ता. मिरज, जि. सांगली) याने तपासादरम्यान पोलिसांच्या वाहनाला धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलीस हद्दीत नाकाबंदी सुरू असताना त्याने शासकीय वाहनांचे नुकसान केले. नाकाबंदीवर तैनात असलेले पोलीस अंमलदार निरोद रझाक शेख यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपीने वाहनाची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले.
 
याप्रकरणी दावडी-दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात सुखदेव नाईक याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस अंमलदार विनोद पाटील, अमोल हंबीर, प्रतीक सावंत, शामराव कराडे, अक्षय पाटील, तुषार घरत यांच्या पथकाने ही कारवाई केली.