ट्रॅफिक चलनाचा बनावट मेसेज; लिंक क्लिक करताच ५ लाख लंपास

कळंबोली येथील प्रकार

By Raigad Times    27-Sep-2026
Total Views |
 new mumbai
 
नवीन पनवेल | वाहनावर ट्रॅफिक चलन झाल्याचा बनावट मेसेज पाठवून त्यातील लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडत कळंबोली येथील नागरिकाची ५ लाख २० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.
 
याप्रकरणी तळोज पोलीस ठाण्यात २३ सप्टेंबर रोजी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासिम कादर अली शेख हे कळंबोली सेक्टर ४ येथे राहतात. त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या वाहनावर ट्रॅफिक चलन झाल्याचा संदेश पाठविला.
 
या संदेशासोबत दिलेली लिंक कासिम शेख यांनी उघडली. लिंक उघडल्यानंतर काही वेळातच त्यांच्या मोबाईलमध्ये अनधिकृत प्रवेश झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून पाच वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे एकूण ५ लाख २० हजार रुपये परस्पर वळते करण्यात आले.
 
खात्यातून रक्कम वळती झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तळोजा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून ऑनलाइन व्यवहार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला आहे. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या संदेशांमधील लिंकवर क्लिक करू नये तसेच अशा संशयास्पद लिंकद्वारे कोणतीही माहिती किंवा बँकिंग तपशील देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.