पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातील लोहारे-देऊळकोंड येथे जन्मदात्या बापानेच आपल्या २३ वर्षीय मुलाच्या छातीवर चाकूने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (२२ सप्टेंबर) घडली. साई सचिन चिकणे असे मृत तरुणाचे नाव आहे. सचिन चिकणे आणि त्यांची पत्नी संध्या यांच्यात वाद झाला.
सचिन यांनी ‘तुमची सर्वांची अकड काढतो’ असे म्हणत शिवीगाळ केली आणि ते स्वयंपाकघरात गेले. यावेळी त्यांचा मोठा मुलगा साई हा वडिलांना आईशी अशाप्रकारे का बोलत आहात, असे समजावण्यासाठी पुढे गेला. त्यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटीदरम्यान सचिन यांनी स्वयंपाकघरात कांदा कापण्यासाठी वापरल्या जाणार्या सुरीने साईच्या छातीच्या डाव्या बाजूस वार केला.
गंभीर दुखापत झाल्याने साई जमिनीवर कोसळला. त्यानंतर सचिन निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप काळे आणि पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याप्रकरणी संध्या चिकणे यांच्या फिर्यादीवरून सचिन बजरंग चिकणे यांच्याविरोधात पोलादपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे करीत आहेत.