रायगडावरील शिवसमाधी, राजसदर अंधारात! कोकण कडा मित्रमंडळाचा आंदोलनाचा इशारा

By Raigad Times    24-Sep-2026
Total Views |
mahad
 
महाड | स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणार्‍या किल्ले रायगडावरील शिवसमाधी, मेघडंबरी आणि राजसदर परिसर गेल्या आठ दिवसांपासून अंधारात असल्याची बाब समोर आली आहे.
 
ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या या परिसरातील प्रकाश व्यवस्था सलग आठ दिवस बंद असूनही ती पूर्ववत करण्यात न आल्याने शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. किल्ले रायगड परिसरातील हॉटेल चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर देशमुख यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून या प्रकाराकडे लक्ष वेधले.
 
त्यानंतर रायगडाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्थानिक पातळीवर मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणचा वीजपुरवठा मीटरपर्यंत सुरू आहे. मात्र मीटरनंतरच्या अंतर्गत विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने शिवसमाधी, मेघडंबरी आणि राजसदर परिसरातील दिवे बंद असल्याचे सांगण्यात आले. मीटरनंतरची विद्युत व्यवस्था तपासून बिघाड दूर करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची असल्याचे सांगण्यात आले.
 
रायगडावर देशभरातून शिवप्रेमी, पर्यटक आणि इतिहासप्रेमी येत असतात. अशा परिस्थितीत शिवसमाधी आणि राजसदरासारख्या महत्त्वाच्या स्थळांवर आठ दिवसांपासून प्रकाश व्यवस्था बंद असणे गंभीर बाब असल्याचे शिवप्रेमींचे म्हणणे आहे. गडावरील सुरक्षा, पर्यटकांची सुविधा आणि ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन यासाठी संबंधित यंत्रणांनी तत्परतेने कार्यवाही करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
 
दरम्यान, पुरातत्व विभागाचे अधिकारी संकेत कवळ्कर यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांनी फोन न उचलल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. किल्ले रायगडावरील राजसदर आणि शिवसमाधी परिसरातील विद्युत व्यवस्था तातडीने पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. विद्युत व्यवस्था पूर्ववत न झाल्यास कोकण कडा मित्र मंडळाच्या वतीने पुरातत्व विभागाविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मंडळाचे अध्यक्ष रोहित पवार यांनी दिला आहे.