अलिबाग | शिक्षकाच्या बदलीच्या प्रकरणात दीड लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे स्वीय सहाय्यक योगेश भस्मे (वय ४६) यांना रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी (२३ सप्टेंबर) रंगेहाथ पकडले.
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यालयातच ही कारवाई करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची पत्नी शिक्षिका असून तिची बदली पोलादपूर येथे झाली होती. मात्र पोलादपूर येथे बदलीच्या ठिकाणी जाण्याची तिची इच्छा नसल्याने तक्रारदाराने पत्नीची बदली पाली येथे करून देण्यासाठी योगेश भस्मे यांची भेट घेतली. यावेळी बदली करून देण्यासाठी भस्मे यांनी तक्रारदाराकडे दीड लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
त्यानंतर तक्रारदाराने याबाबत रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने बुधवारी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना योगेश भस्मे यांना जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
योगेश भस्मे यांनी स्वीकारलेली लाच स्वतःच्या फायद्यासाठी मागितली होती की अन्य कोणाच्या सांगण्यावरून किंवा अन्य व्यक्तीसाठी स्वीकारली होती, याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे. बदलीच्या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जाणार आहे. या प्रकरणी योगेश भस्मे यांच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एसीबीच्या पुढील तपासात या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.