खालापूर | अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवून तंबाखू व खाऊ आणण्यासाठी घरी बोलावल्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना खालापूर पोलीस ठाणे हद्दीत घडली. या प्रकरणी खालापूर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडली.
आरोपीला पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही त्याने तिला पैसे देऊन दुकानातून तंबाखू व खाऊ आणण्यास सांगितले. त्यानुसार मुलगी संबंधित वस्तू घेऊन आरोपीच्या घरी गेली असता आरोपीने बळजबरीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. यानंतर आरोपीने कोयत्याचा धाक दाखवून या घटनेची माहिती आई-वडिलांना दिल्यास पीडित मुलगी तसेच तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला २२ सप्टेंबर रोजी पहाटे २.४३ वाजण्याच्या सुमारास अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण करीत आहेत.