नेरळ-माथेरान मिनीट्रेन मार्गावर दरड कोसळली

By Raigad Times    24-Sep-2026
Total Views |
karjat
 
कर्जत | पावसाळी विश्रांतीनंतर पर्यटकांच्या सेवेत दाखल होण्यापूर्वीच नेरळ-माथेरान मिनीट्रेन मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने अचानक जोर धरल्याने माथेरान घाटातील नॅरोगेज मार्गावरील १४२ क्रमांकाच्या वळणावर मोठ्या प्रमाणात माती व दगड रेल्वे मार्गावर कोसळले.
 
ब्रिटिश काळापासून सुरू असलेली नेरळ- माथेरान मिनी ट्रेन पावसाळ्यात खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवली जाते. साधारण जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत या मार्गावर दुरुस्ती व देखभालीची कामे रेल्वेकडून केली जातात. माथेरानच्या डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने दरडी कोसळून रेल्वे मार्ग तसेच घाटरस्त्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. यंदा गेल्या तीन महिन्यांपासून मिनी ट्रेन मार्गावरील दुरुस्तीची कामे वेगाने सुरू होती.
 
मात्र, अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे १४२ क्रमांकाच्या वळणावर दरड कोसळली. मातीसोबत मोठा दगडही रेल्वे मार्गावर येऊन पडला आहे. त्यामुळे मार्ग पूर्ववत करण्यासाठी रेल्वे कर्मचार्‍यांना अतिरिक्त मेहनत घ्यावी लागत आहे. दरम्यान, मार्गावरील दगड बाजूला करण्यासह आवश्यक दुरुस्तीचे साहित्य नेण्यासाठी नेरळ येथून मालवाहू गाडी सोडण्यात आली आहे.
 
रेल्वे कर्मचारी मार्गावरील अडथळे दूर करून नॅरोगेज मार्ग वाहतुकीसाठी सुस्थितीत आणण्याचे काम करीत आहेत. मिनी ट्रेनची पावसाळ्यानंतरची प्रवासी सेवा १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याने, त्यापूर्वी मार्गाची दुरुस्ती पूर्ण करण्याचे आव्हान रेल्वेसमोर आहे.