महाड | महाड येथील सावित्री नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. मात्र, राम घाटासमोरील सावित्री नदीचे पात्र अक्षरशः कोरडे पडले आहे. नदीपात्राची झालेली अवस्था पाहून "गाळ काढला की माल काढला?” असा सवाल महाडमधील संतप्त भोईबांधवांनी उपस्थित केला आहे.
महाडला पूरमुक्त करण्यासाठी पालकमंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून सावित्री नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे २०२१ नंतर महाड शहरासह नदीकाठच्या गावांमध्ये पूरपातळी कमी होऊन नुकसान टळल्याचे चित्र आहे.
यंदाही दादली पुलापासून पुढे भोई घाट ते राम घाट परिसरापर्यंत गाळ काढण्याचे काम करण्यात आले. मात्र, हे काम करताना नदीच्या नैसर्गिक प्रवाहाचा आणि पात्राच्या खोलीचा शास्त्रोक्त पद्धतीने विचार करण्यात आला का, असा सवाल उपस्थित होत आहे.
राम घाटासमोरील पात्र कोरडे कसे?
गणेश विसर्जनाच्या काळात या कामाचे दुष्परिणाम प्रकर्षाने समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. महाड शहरातील सार्वजनिक तसेच घरगुती गणपतींचे विसर्जन विविध घाटांवर केले जाते. मात्र, यंदा गवळ आळी परिसरातील राम घाटासमोरील सावित्री नदीचे पात्र पूर्णतः कोरडे पडल्याने विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
काही भाविकांना दुसर्या घाटाचा आधार घ्यावा लागला, तर राम घाटावर आलेल्या नागरिकांना गणरायाची मूर्ती घेऊन नदीपात्रातून पायी चालत पाणी असलेल्या ठिकाणापर्यंत जावे लागले. ज्या नदीपात्रात बाराही महिने पायरीपर्यंत पाण्याचा प्रवाह असतो, त्याच ठिकाणी सध्या वाळू आणि उथळ पात्र दिसत असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले गेली ४० ते ५० वर्षे राम घाट परिसरात गणेश विसर्जनाची सेवा बजावणार्या भोई बांधवांनी या परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, गाळ काढताना नदीपात्रातील सोयीच्या ठिकाणी खोदाई करण्यात आली. मात्र, काढलेला गाळ योग्य पद्धतीने बाहेर न काढता काही ठिकाणी तो पात्रातच टाकण्यात आला. त्यामुळे पूर्वी खोल असलेला राम घाटासमोरील नदीपात्राचा भाग उथळ झाला. परिणामी नदीच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला आणि त्याचाच परिणाम म्हणून राम घाटासमोरील पात्र कोरडे पडल्याचा आरोप भोई बांधवांनी केला आहे.
ठेकेदारावर नियंत्रण कोणाचे? गाळ काढताना तज्ज्ञ अधिकार्यांचे सातत्यपूर्ण नियंत्रण आणि नदीपात्राच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास आवश्यक असतो. मात्र, प्रत्यक्ष कामावर हे नियंत्रण कितपत होते, कामाची गुणवत्ता तपासली गेली का, तसेच गाळ काढण्यापूर्वी आणि त्यानंतर नदीपात्राचे सर्वेक्षण करण्यात आले का, याची उत्तरे प्रशासनाने देणे गरजेचे आहे. मंत्री भरत गोगावले यांचा महाडला पूरमुक्त करण्याचा उद्देश असला, तरी त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदाराची आहे.
त्यामुळे कामाची अंमलबजावणीही तितकीच शास्त्रोक्त आणि पारदर्शक असणे आवश्यक आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलत असेल, तर या कामाचा फेरआढावा घेण्याची गरज असल्याची मागणी होत आहे. दरम्यान, प्रा. डॉ. समीर बुटाला यांनीही राम घाटासमोरील सावित्री नदीपात्राची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले. "गाळ काढताना नदीचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी आवश्यक असलेल्या चॅनेलप्रमाणे खोदाई होणे गरजेचे होते. मात्र, तसे न होता केवळ खड्डे मारले गेले,” असे त्यांनी सांगितले.