महाड | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन गुजरातच्या दिशेने नेण्यात येत असलेला गोवा बनावटीच्या मद्याचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने महाड तालुक्यातील केंबुर्ली गावाच्या हद्दीत पकडला. या कारवाईत १ कोटी ४९ लाख १८ हजार ४०० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.
ट्रकमधून रॉयल ब्लू मल्टी व्हिस्कीचे तब्बल १ हजार ४८० बॉक्स आढळून आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांच्या आदेशानुसार मुंबई- गोवा महामार्गावर पथकाने सापळा रचला होता. सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास आरजे-१९- जीई-४११५ क्रमांकाचा संशयित ट्रक केंबुर्ली गावाच्या हद्दीत येताच तो थांबवून अधिकार्यांनी झडती घेतली.
त्यावेळी ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची रॉयल ब्लू मल्टी व्हिस्की आढळून आली. ट्रकचालकाला ताब्यात घेऊन वाहन महाड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. चौकशीत हा मद्यसाठा गोवा राज्यातून गुजरातच्या दिशेने वाहतूक करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या प्रकरणी प्रभुलाल भवरलाल साळवी (रा. राजस्थान) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
कारवाईत १ कोटी ४९ लाख १८ हजार ४०० रुपये किमतीचा मद्यसाठा, १० लाख रुपये किमतीचा ट्रक आणि ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल, असा एकूण १ कोटी ५९ लाख २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत दुय्यम निरीक्षक एस. पी. पीसाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक निमेश नाईक, जवान मनोज गायकवाड, ज्ञानेश्वर पोटे आणि महिला जवान रचना मोहिते सहभागी झाले.