कर्जत येथील टोरंट प्रकल्पाची माहिती सार्वजनिक करा ; पर्यावरण बचाव समितीची मागणी

By Raigad Times    19-Sep-2026
Total Views |
karjat
 
कर्जत | कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरंट प्रकल्पाची संपूर्ण कागदपत्रे, नकाशे व ब्लूप्रिंट सार्वजनिक करावी, अशी मागणी पर्यावरण बचाव समितीने केली आहे. प्रकल्पाची अधिकृत माहिती उपलब्ध होईपर्यंत शेतकर्‍यांनी आपल्या जमिनीबाबत घाईने कोणताही निर्णय घेऊ नये, असे आवाहन समितीने केले आहे.
 
टोरेंट पॉवर एनर्जी स्टोरेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडकडून प्रस्तावित प्रकल्पासाठी भालीवाडी, पोटल, आंबोट, सायडोंगर आणि पाली परिसरातील जमिनी तसेच मिसिंग लिंक रस्त्याचा विषय चर्चे त आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाचा आराखडा, जमीन संपादनाची प्रक्रिया आणि पर्यावरणीय परिणाम याबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
मिसिंग लिंक रस्त्याचा अंतिम नकाशा, मार्ग, लांबी, रुंदी, वळणे, उतार आणि प्रभावित सर्व्हे क्रमांक जाहीर करावेत. तसेच भूसंपादनाची कायदेशीर प्रक्रिया, वनमंजुरीची सद्यस्थिती, ३ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या जनसुनावणीचा अहवाल, ट्रान्समिशन मार्गिकेचा आराखडा आणि प्रस्तावित धरणे व जलाशयांची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी समितीने केली आहे. टोरंट प्रकल्पामुळे कर्जतच्या पर्यावरणावर परिणाम होणार असल्याने हा प्रकल्प हद्दीपार करावा, अशी भूमिका पर्यावरण बचाव समितीचे अ‍ॅड. कैलास मोरे यांनी मांडली.