मॉडेल कंचन कश्यप मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा

By Raigad Times    19-Sep-2026
Total Views |
 panvel
 
पनवेल | मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या २६ वर्षीय कंचन कश्यप हिच्या मृत्यूप्रकरणाला काही महिन्यांनंतर नवे वळण मिळाले आहे. कंचनच्या मोबाईलमधील व्हॉट्सअ‍ॅप संभाषणे, विवाह प्रमाणपत्र आणि अन्य कागदपत्रांच्या आधारे तिच्या वैवाहिक आयुष्यात कथित छळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
याप्रकरणी कंचनच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलिसांनी जितेश कदम याच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. मूळची दिल्ली येथील रहिवासी असलेली कंचन सुमारे पाच वर्षांपूर्वी मुंबईत आली होती. मॉडेलिंग क्षेत्रात काम करत असताना तिची जितेश कदम याच्याशी ओळख झाली. पुढे दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती.
 
कंचनच्या मृत्यूनंतर तिच्या मोबाईलमधील व्हॉट्सअ‍ॅप संभाषणे, विवाह प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. या कागदपत्रांच्या आधारे कंचनला वैवाहिक आयुष्यात मानसिक तसेच अन्य प्रकारचा त्रास दिल्याचा आरोप तिच्या आईने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीच्या आधारे पनवेल शहर पोलिसांनी जितेश कदम याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत्यूचे नेमके कारण तसेच तक्रारीतील आरोपांची सत्यता याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.