अलिबाग | आज रायगड जिल्ह्यात १७ हजारांहून अधिक ठिकाणी गौरी पूजनाचा मंगलसोहळा रंगणार आहे. गौरीच्या स्वागतासाठी घराघरांत जय्यत तयारी करण्यात आली असून, पारंपरिक पद्धतीने गौरीची प्रतिष्ठापना करून पूजा- अर्चा, आरती आणि नैवेद्य केला जाणार आहे.
गौरी पूजनाच्या निमित्ताने महिला वर्गात विशेष उत्साह असून, जिल्ह्यातील अनेक कुटुंबांमध्ये पहाटेपासूनच पूजेची लगबग सुरू होणार आहे. गौरी गणपती पूजनासाठी गेल्या काही दिवसांपासून घरांची स्वच्छता आणि सजावटीची तयारी करण्यात येत होती. फुलांची आरास, पारंपरिक साड्या, दागिने, विविध अलंकार आणि विद्युत रोषणाईने गौरीचे स्थान सजविण्यात आले आहे. काही घरांमध्ये धान्य, फळे, भाज्या तसेच विविध घरगुती वस्तूंची पारंपरिक पद्धतीने मांडणी करण्यात येणार आहे.
कुटुंबाच्या परंपरेनुसार गौरीची सजावट करण्यासाठी महिलांनी विशेष मेहनत घेतली आहे. गौरी पूजनानिमित्त घराघरांत विविध पारंपरिक पदार्थांची तयारी करण्यात आली आहे. गौरीला नैवेद्य दाखविल्यानंतर सुवासिनींना हळदी-कुंकवासाठी आमंत्रित करण्याची परंपराही अनेक कुटुंबांमध्ये आहे. ग्रामीण भागात या परंपरेचे विशेष जतन केले जाते.
घरातील ज्येष्ठ महिलांकडून पुढील पिढीला पूजेची पद्धत आणि रूढी समजावून सांगितल्या जात असल्याने उत्सवाला सांस्कृतिक वारशाचेही स्वरूप प्राप्त झाले आहे. गणरायाच्या आगमनानंतर गौरीचे पूजन हा गणेशोत्सवातील महत्त्वाचा धार्मिक सोहळा मानला जातो. आजच्या पूजनामुळे रायगडमधील गणेशोत्सवाला आणखी रंगत येणार असून, भक्तिभाव, पारंपरिक सजावट आणि उत्साहाने जिल्ह्यातील अनेक परिसर गौरीमय होणार आहेत.