नवी मुंबई विमानतळावर लँडिंग शुल्कात सवलत

By Raigad Times    18-Sep-2026
Total Views |
ALIBAG
 
नवी मुंबई | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीला चालना देण्यासाठी भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने (एअरपोर्ट्स इकॉनॉमिक रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया - एअर) सुधारित शुल्क सवलत योजनेला मंजुरी दिली आहे.
 
नव्या आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांवर सेवा सुरू करणार्‍या विमान कंपन्यांना लँडिंग शुल्कात मोठी सवलत मिळणार असल्याने विमानतळावरून थेट विदेशी उड्डाणांची संख्या वाढण्यास मदत होण्याची शक्यता आहे.नवी मुंबई विमानतळाने प्रस्तावित केलेल्या सुधारित योजनेनुसार, सवलतीसाठी पात्र ठरणारे मार्ग हे मुंबई महानगर प्रदेशातील विद्यमान मार्ग नसून नवी मुंबई विमानतळावरून सुरू होणारे नवीन आंतरराष्ट्रीय मार्ग असतील.
 
त्यामुळे या विमानतळावरून नव्या विदेशी साठी सेवा सुरू करणार्‍या विमान कंपन्यांना सवलतीचा थेट लाभ मिळणार आहे. नवीन आंतरराष्ट्रीय प्रवासी मार्ग सुरू करणार्‍या विमान कंपन्यांना पहिल्या वर्षी लँडिंग शुल्कात १०० टक्के सवलत मिळणार आहे. पाच हजार किलोमीटरपर्यंतच्या मार्गांसाठी दुसर्‍या वर्षी ५० टक्के सवलत दिली जाईल. पाच हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या लांब पल्ल्याच्या मार्गांसाठी दुसर्‍या वर्षी ५० टक्के, तर तिसर्‍या वर्षी २५ टक्के सवलत देण्यात येणार आहे.
 
सध्याच्या आंतरराष्ट्रीय मार्गांवर अतिरिक्त विमानफेर्‍या सुरू करणार्‍या विमान कंपन्यांनाही लँडिंग शुल्कात ७५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय मालवाहू विमानसेवांसाठी पहिल्या वर्षी ९० टक्के आणि दुसर्‍या वर्षी ५० टक्के शुल्कसवलत देण्यात येणार आहे. या सवलतीमुळे नवी मुंबई विमानतळावरून नवीन आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्यांना प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. विमान कंपन्यांमध्ये वाढणार्‍या स्पर्धेचा प्रवाशांना तिकीट दरांच्या बाबतीतही फायदा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.