पनवेल | पनवेलजवळील गव्हाण फाटा येथे एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह परिसरातील नाल्यात पुरून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पनवेल शहर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
गव्हाण फाटा येथील वाहतूक पोलीस चौकीजवळ नाल्यात महिलेचा मृतदेह पुरून ठेवल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच परिमंडळ-३ चे सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, पोलीस निरीक्षक नासिर पटेल तसेच गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली.
पोलिसांनी पाहणी करून नाल्यातून मृतदेह बाहेर काढून ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी परिसराची पाहणी करून चौकशी सुरू केली असून, तपासादरम्यान काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. मृत महिलेची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.