नागोठणे | सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करून त्याचे पैसे चेकद्वारे देतो, असे सांगत दोन व्यापार्याची ३ लाख ७९ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नागोठणे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजल्यापासून दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत नागोठणे येथील परमार ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून सोन्या-चांदीचे दागिने खरेदी केले. त्यानंतर त्याचे पैसे चेकद्वारे देतो, असे वारंवार सांगितले.
मात्र, खात्यात पुरेशी रक्कम नसतानाही चेक दिल्याचा आरोप आहे. या प्रकारात फिर्यादीचे २ लाख ९९ हजार ५०० रुपये, एका साक्षीदाराचे ८० हजार रुपये तसेच अन्य एका साक्षीदाराकडून कपडे घेऊन त्याचे पैसे न दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. अशा प्रकारे एकूण ३ लाख ७९ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीताला अटक करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक नागदिवे करीत आहेत.