श्रीवर्धन | बेरोजगारी आणि आरोग्यसेवेच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ गाव आगरी युवा संघाच्या वतीने खारगाव बुद्रुक ते दिघी पोर्टदरम्यान बाईक रॅली काढण्यात आली. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधींपासून डावलले जात असल्याचा आरोप करत संघटनेने ‘आम्हाला आमच्या हक्काचा रोजगार द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा’ असा नारा देत सरकारचे लक्ष वेधले.
श्रीवर्धन मतदारसंघातील किनारपट्टी वगळता अनेक गावांमधून रोजगाराच्या शोधात तरुण मुंबई- पुण्याकडे स्थलांतरित झाल्याचा दावा संघटनेने केला. त्यामुळे अनेक गावांतील घरे बंद असून, स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची मागणी करण्यात आली.
त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. श्रीवर्धन मतदारसंघात दास ऑफशोरसारखी जहाजबांधणी कंपनी तसेच दिघी पोर्टसारखा मोठा औद्योगिक प्रकल्प असतानाही स्थानिक तरुणांना अपेक्षित रोजगाराच्या संधी मिळत नसल्याचा आरोप १८ गाव आगरी युवा संघाने केला आहे. स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना रोजगाराच्या संधी दिल्या जात असल्याचा गंभीर आरोपही संघटनेने केला.
‘स्थानिक भूमिपुत्रांवर होत असलेल्या अन्यायाविरोधातील ही लढ्याची सुरुवात आहे,’ अशी भूमिका १८ गाव आगरी युवा संघाचे अध्यक्ष अॅड. धनंजय चौलकर यांनी मांडली. आरोग्य केंद्रांनाही निवेदन बाईक रॅलीपूर्वी स्थानिक नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, या मागणीसाठी म्हसळा ग्रामीण रुग्णालय तसेच खारगाव, मेंदडी, बोर्ली आणि दिघी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना निवेदने देण्यात आली. रोजगाराबरोबरच आरोग्यसेवा हा ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित महत्त्वाचा प्रश्न असल्याचे संघटनेने म्हटले आहे. दरम्यान, "सरकारने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे; अन्यथा जनआंदोलन उभारले जाईल” असा इशारा अॅड.धनंजय चौलकर यांनी दिला.