मनोज जरांगे यांचा शुक्रवारी खोपोलीत डेरा ; स्वागताची जोरदार तयारी, धाकटी पंढरीच्या मैदानात मुक्कामाची व्यवस्था

By Raigad Times    17-Sep-2026
Total Views |
karjat
 
खोपोली | मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे निघालेल्या मोर्चाचा चौथा मुक्काम शुक्रवारी, दि. १८ सप्टेंबर रोजी खोपोलीत होणार आहे. यासाठी ताकई येथील धाकटी पंढरीच्या मैदानात हजारो आंदोलकांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलकांसाठी चहा-नाश्ता, जेवण, पाणी आणि अन्य आवश्यक सुविधांची तयारी सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानावर १९ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी मुंबईकडे मोर्चा वळविला आहे. अंतरवाली सराटी येथील बैठकीनंतर त्यांच्या मुंबई दौर्‍याचा मार्ग आणि मुक्कामाचे नियोजन जाहीर करण्यात आले. त्यानुसार खोपोली येथे मुक्काम होणार असल्याने सकल मराठा समाजाने तयारीला वेग दिला आहे.
 
या पार्श्वभूमीवर धाकटी पंढरीच्या मैदानात सकल मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक झाली. यावेळी राज्य समन्वयक डॉ. सुनील पाटील, शंकर थोरवे, मधुकर घारे, राजेश लाड यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल पाटील आणि पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनीही उपस्थित राहून नियोजनाचा आढावा घेतला. हजारो आंदोलक येण्याची शक्यता असल्याने त्यांच्या रात्रीच्या विश्रांतीसह भोजन, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात येत आहे.
 
"आंदोलकांच्या मूलभूत सुविधांची योग्य व्यवस्था करण्यासाठी समाजबांधव तयारीला लागले आहेत,” अशी माहिती डॉ. सुनील पाटील यांनी दिली. "सरकार आश्वासन देऊन फसवत असल्याचे समाजाला समजले आहे. त्यामुळे आता माघार घेणार नाही. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी खोपोलीतील मुक्काम महत्त्वाचा आहे,” अशी भूमिका शंकर थोरवे यांनी व्यक्त केली. "ही आरपारची लढाई असल्याने सर्व समाजबांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे,” असे मधुकर घारे यांनी सांगितले. मागण्यांवर तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.