अलिबागमध्ये ७ सप्टेंबरला डाक अदालत

By Raigad Times    01-Sep-2026
Total Views |
post
 
अलिबाग | रायगड विभागातील नागरिकांच्या डाक सेवेसंबंधी तक्रारींच्या निवारणासाठी अधीक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग यांच्या कार्यालयामार्फत ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.
 
इच्छुक ग्राहकांनी आपल्या तक्रारी दोन प्रतींमध्ये ३ सप्टेंबरपर्यंत अधीक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग यांच्याकडे पोहोचतील अशा पद्धतीने पाठवाव्यात, असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग, अलिबाग राजेश रनाळकर यांनी केले आहे. रायगड विभागातील डाक सेवेशी संबंधित ज्या तक्रारी सहा आठवड्यांच्या कालावधीत निकाली काढण्यात आलेल्या नाहीत, अशा तक्रारींचा डाक अदालतीमध्ये विचार करण्यात येणार आहे.
 
यामध्ये टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर आदी सेवांशी संबंधित तक्रारींचा समावेश आहे. तक्रार सादर करताना तक्रारीचा दिनांक, मूळ तक्रार कोणत्या अधिकार्‍याकडे दाखल केली होती, त्या अधिकार्‍याचे नाव व पद यांसह तक्रारीशी संबंधित सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे.
आता दरमहा होणार डाक अदालत
दरम्यान, यापुढे त्रैमासिक आयोजित होणारी डाक अदालत दरमहा आयोजित करण्यात येणार आहे. ७ सप्टेंबर रोजी होणारी डाक अदालत या उपक्रमातील पहिली डाक अदालत असेल. त्यानंतर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी दुपारी ३ वाजता डाक अदालत घेण्यात येईल. ज्या महिन्यात पहिला सोमवार सार्वजनिक सुट्टीचा दिवस असेल, त्या महिन्यात त्यानंतरच्या दिवशी डाक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. याबाबतचे स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती डाक विभागाने दिली आहे.