महाडमध्ये अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; एकाला अटक

दारुच्या बाटल्यांसह ७७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

By Raigad Times    01-Sep-2026
Total Views |
mahad
 
महाड | महाड शहरातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, देशी-विदेशी दारूची अवैध वाहतूक करणार्‍या एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत दारूच्या बाटल्यांसह दुचाकी असा एकूण ७७ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 
३१ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास विसावा कॉर्नरकडे जाणार्‍या रस्त्यावर एक व्यक्ती मोटारसायकलवरून नायलॉनच्या पिशवीत देशी-विदेशी दारू घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक नारायण एकशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन मोहिते व पथकाने कारवाई करत प्रताप प्रभाकर शिंदे (६०) याला ताब्यात घेतले.
 
त्याच्याकडून विविध कंपन्यांच्या देशी- विदेशी दारूच्या बाटल्या तसेच सुमारे ६० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.त्यामुळे अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.
 
दरम्यान, आगामी काळातही अवैध दारूविक्री, वाहतूक आणि इतर गैरप्रकारांविरोधात धडक कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करून संशयास्पद हालचालींची माहिती तातडीने द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.