अलिबाग | पावसाळ्यातील तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा-अलिबाग जलवाहतुक सेवा आजपासून (१ सप्टेंबर) सुरू होणार आहे. त्यामुळे जलमार्गावरुन प्रवास करणार्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मुंबईला अलिबागशी जोडणारा हा सागरी मार्ग वेळेची बचत करणारा आणि सोयीचा पर्याय मानला जातो.
विशेषतः आठवड्याच्या सुट्यांमध्ये तसेच सण-उत्सवांच्या काळात या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, पावसाळ्यात समुद्रातील प्रतिकूल हवामान आणि खवळलेल्या समुद्रामुळे या मार्गावरील जलवाहतूक तीन महिने बंद ठेवण्यात येते. जलवाहतूक बंद असल्याने या काळात मुंबईहून अलिबाग तसेच रायगडातील इतर पर्यटनस्थळांकडे येणार्या पर्यटकांना रस्ते मार्गाचा आधार घ्यावा लागतो.
त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढण्याबरोबरच पर्यटन व्यवसायावरही त्याचा परिणाम होतो. अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन यांसारख्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी जलवाहतूक सेवा महत्त्वाची भूमिका बजावते. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फेरीबोट सेवा पुन्हा सुरू होत असल्याने मुंबई आणि रायगडदरम्यान प्रवास करणार्या नागरिकांची सोय होणार आहे. तसेच आगामी पर्यटन हंगामात हॉटेल, रेस्टॉरंट, स्थानिक वाहतूक, जलक्रीडा आणि अन्य पर्यटन व्यवसायांनाही याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.